सांगलीतील न्यू प्राईडमध्ये कोविड केअर सेंटर सुरू होणार 

बलराज पवार 
Thursday, 3 September 2020

इंडियन मेडिकल असोसिएशन, जीपी फोरम आणि निमाच्या वतीने शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

सांगली : इंडियन मेडिकल असोसिएशन, जीपी फोरम आणि निमाच्या वतीने शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. शहरातील हॉटेल न्यू प्राईडच्या इमारतीमध्ये हे अद्यावत सुविधांसह विलगीकरण सेंटर असणार आहे. शुक्रवारपासून (ता. 4) हे सेंटर सुरू होणार आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 30 खोल्यांमध्ये रुग्णांची विलगीकरणाची सोय करण्यात येणार आहे. त्यानंतर ही संख्या 70 पर्यंत वाढवता येऊ शकते. 

महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि सांगली आयएमए, जीपी फोरम, निमाचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेच्या डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व कोरोना केअर सेंटरला दिलेल्या भेटीनंतर सांगली शहरातील हॉटेल प्राईड येथे कोविड केअर सेंटर सुरू करीत आहे. त्याचे काम सुरु आहे. 

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, आयएमए, जीपी फोरम, निमाच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या संघटनांचे डॉक्‍टर या सेंटरमध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करतील. त्याची तयारी सुरु आहे. येथे एकूण 70 खोल्या आहेत. त्यांचा उपयोग सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी होईल. 

आयएमएचे अध्यक्ष डॉ. एस. डी. मालगावे व सचिव डॉ. श्रीनिकेतन काळे म्हणाले, आयएमए, जीपी फोरम, निमाच्यावतीने आम्ही हॉटेल न्यू प्राईड येथे सर्व अद्यावत सुविधांसह कोविड केअर सेंटर सुरू करत आहोत. सौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉझिटिव रुग्णांना येथे विलगीकरण करण्यात येईल. त्यांना डॉक्‍टरांकडून तपासणी, 24 तास अत्यावश्‍यक सेवा, औषधोपचार करण्यात येतील. या सेंटरसाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांचे सहकार्य मिळाले. 

शुक्रवारपासून हे केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने तेथे सर्व आवश्‍यक ती तयारी करण्यात येत आहे. हे सेंटर सशुल्क असणार आहे. रुग्णाची तब्येत बिघडल्यास त्यांना कोविड रुग्णालयात हलवण्यात येईल. अशा प्रकारची सशुल्क हॉटेलमधील ही जिल्ह्यातील पहिलीच सुविधा आहे. यावेळी डॉ. अरुण कोळी, डॉ. अनिता पागे, डॉ. बरगाले, डॉ. दिवाण उपस्थित होते. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kovid Care Center will be started at New Pride in Sangli