कोयनेत ६९, चांदोलीत १९ टीएमसी पाणी

कोयनेत ६९, चांदोलीत १९ टीएमसी पाणी

सांगली - सन २०१९ हे निवडणूक वर्ष म्हणून चर्चेत असले तरी सोबतीला दुष्काळाचा दाह तितकाच तीव्र आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ या चार उपसा सिंचन योजना सध्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. 

सुदैवाने कोयना आणि चांदोली धरणांतील पाणीसाठा चांगला आहे. त्यामुळे जूनपर्यंत तरी सांगली जिल्ह्याला दुष्काळाशी सामना करण्याचा पाणीदार आधार आहे. अर्थात, त्याचे योग्य नियोजन करताना व्यवस्थेवर  काहीसा ताण पडू लागला आहे. 

उपसा आणि विसर्ग याच्या नियोजनात विस्कळितपणा आल्याने सांगलीत कृष्णेची पातळी घटली आहे. या चुका टाळतानाच एप्रिल-मे महिन्यात पाण्यासाठीचा संघर्ष टाळण्याचे मुख्य आव्हान पाटबंधारे विभागासमोर असणार आहे.  

जिल्ह्यातील ११३ गावे आणि ७६९ वाड्यांवर सध्या दुष्काळी परिस्थितीचा सामना अधिक तीव्रतेने करावा लागत आहे. जत, आटपाडी, खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या पाच तालुक्‍यांतील या गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय.

१०८ टॅंकर कार्यरत असून त्यासाठी ९२ विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. जत तालुक्‍यात तीव्रता अधिक असून तेथील ६३ गावे आणि ४९६ वाड्यांवर ६८ टॅंकरने पाणी दिले जात आहे. खानापूर तालुक्‍यात आठ टॅंकर सुरू असून, नऊ गावे व वाड्यांवर पाणीपुरवठा सुरू आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात आठ टॅंकरने १४ गावे आणि ६२ वाड्यांवर पाणीपुरवठा केला जातोय. 
तासगाव तालुक्‍यात तीन  टॅंकरने तीन गावे आणि २५ वाड्यांची तहान भागवली जात आहे. आटपाडी तालुक्‍यात २१ टॅंकर सुरू असून, २४ गावे ९६ वाड्यांवर पाणीपुरवठा सुरू आहे. 

गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत ही उपाययोजना अत्यंत नाममात्र म्हणता येईल, कारण दुष्काळाच्या दाहकतेत उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने मोठा आधार दिला आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि आरफळ या चारही योजना पूर्ण क्षमतेने सुरू असून  तलाव भरून घेतले गेले आहेत. विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. हे आवर्तन मेअखेर आणि अगदी जूनपर्यंत चालवले तरी धरणातील पाणीसाठी पुरेसा ठरेल, अशी सध्याची आशादायक स्थिती आहे. 

सांगलीत कृष्णेने तळ का गाठला?
कृष्णा नदीवरील टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजना एकाचवेळी वाढीव पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. टेंभूचे १७ आणि ताकारीचे नऊ असे एकूण २६ पंप एकावेळी सुरू करण्यात आले. त्या तुलनेत कोयना धरणातून विसर्ग सुरू नव्हता. त्यामुळे टेंभू आणि ताकारीच्या बंधाऱ्यांतून पाणी पुढे वाहते राहिले नाही. परिणामी, सांगलीत कृष्णा नदीपात्र कोरडे पडले. 

कोयना धरण 
 क्षमता ः १०५ टीएमसी 
 साठा ः ६९.५५ टीएमसी 
 विसर्ग ः २२०० क्‍यूसेक

चांदोली धरण
 क्षमता ः ३५ टीएमसी 
 साठा ः १९.६४ टीएमसी 
 विसर्ग ः ८०० क्‍यूसेक

उपसा सिंचन योजनांतून उपसा
(१५ ऑक्‍टोबर २०१८ ते  २८ फेब्रुवारी २०१९)

 टेंभू ः ७ टीएमसी
 ताकारी ः ३ टीएमसी
 म्हैसाळ ः ८ टीएमसी
 मार्च ते मेअखेर नियोजित मागणी ः सुमारे २५ टीएमसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com