वाळवा तालुक्याला कृष्णा अन् वारणेच्या महापुराचा वेढा; 40 गावे बाधीत

walwa.jpg
walwa.jpg

इस्लामपूर : वाळवा तालुक्याला कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या महापुराने वेढा टाकला आहे. या दोन नद्यांना आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील सुमारे 40 हुन अधिक गावे बाधीत झाली आहेत. सुमारे 35 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासन, खासगी स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते पुरग्रस्तांच्या मदतीला पाण्यात उतरले आहेत.

आपल्या परीने जशी मदत करता येईल तशी करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु आहे. प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या सर्वात जनावरांचे मोठे हाल होत आहेत. कणेगाव येथे पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंद केल्याने तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यात अडकलेल्या प्रवाशांचे हाल सुरु हाल झाले.

वारणा नदीकाठावरील चिकुर्डे, देवर्डे, ऐतवडे खुर्द, कुंडलवाडी, तांदूळवाडी, कणेगाव, भरतवाडी, शिगाव, बागणी तर कृष्णा नदीकाठावरील तांबवे, नरसिंहपूर, कोळे, बहे, शिरटे, बिचूद, रेठरेहरणाक्ष, ताकारी, खरातवाडी, फार्णेवाडी, मसुचीवाडी, बोरगाव, गौंडवाडी, साटपेवाडी, बनेवाडी, जुनेखेड, नवेखेड, वाळवा, शिरगाव, कारंदवाडी, कृष्णानगर या गावांना महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे.या गावातील पशुधनासह लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी प्रशासनासह सामाजिक मंडळांचे अहोरात्र प्रयत्न सुरु आहेत. जिथे प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडतायत त्याठिकाणी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. या गावातील सुमारे 35 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

वाळवा : परिसरात आज पाचव्या दिवशीही संततधार पाऊस सुुरु होता. पावसाने ओढे, नाले, नदी तुडुंब वहात आहेत. वाळवा, शिरगाव, नागठाणे, सूर्यगाव या ठिकाणी महापुराची स्थिती आहे. संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिपावसाने खरीप पीकांची वाढ खुंटली आहे. शेतात गुडघाभर पाणी आहे. त्यामुळे खरीप हातची जाण्याची चिन्हे आहेत. संततधार पावसामुळे जनावरांचेही मोठे हाल होत आहेत.

इटकरे : कोल्हापूरकडे जाणारी वाहने राष्ट्रीय महामार्गावर कणेगाव येथे अडवली आहेत. त्यामुळे वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा लागल्या आहेत. वाहनात प्रवासी अडकून पडले असल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. कणेगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर पाणी येण्यासाठी अवघे दोन फुट अंतर राहिले आहे. कणेगाव व भरतवाडी या दोन गावातील सर्व लोकांसह जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तांदूळवाडी, येलूर, इटकरे या जवळच्या गावांमध्ये पुरबाधीत गावातील जनावरांना आसरा देण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी शेतातील ऊस कापून पुरबाधीत जनावरांना दिला आहे. 

बागणी : शिगाव येथील सुमारे चाळीस कुुटुंबे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. त्यांची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेत केली आहे. शिगाव मधील स्मशानभूमी पूर्ण पाण्यात आहे. शिगाव पुलाजवळ पाण्याची पातळी 58 फुटापर्यंत गेली आहे.

नवेखेड : नवेखेड, जुनेखेड, बोरगाव परिसराला महापुराचा विळखा घट्ट झाला आहे. पाणी वाढल्याने बर्‍याच ठिकाणचे मार्ग बंद आहेत. जुनेखेड गावाचा संपर्क तुटला आहे. 300 हुन अधिक लोक पुरात अडकले आहेत. प्रशासनाने त्यांना कोणतीही मदत उपलब्ध करुन दिलेली नाही. पाण्याचा जोर वाढत आहे. 

किल्लेमच्छिंद्रगड : नरसिंहपूर, शिरटे, येडेमच्छिंद्र, कोळे, बिचुद, रेठरे हरणाक्ष येथील शेतीला तळ्यांचे स्वरुप आले आहे. सततच्या पावसाने किल्लेमच्छिंद्रगड येथे घरांची पडझड सुरु झाली असुन नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी हजर  नसल्याने नागरिकांमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ऐतवडे खुर्द : परिसरातील पर्वतवाडी, गुरव गल्ली, लोहार गल्ली, गुजरवटी, गायरान, बाजारपेठ या भागात पाणी आल्याने येथील हजारो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर सांस्कृतिक हॉल, शाळा, मंदिरे येथे लोकांची व्यवस्था केली आहे. ग्रामपंचायतस स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक मंडळांनी पुरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com