कृष्णा नदीकाठावरच कचऱ्याचे डंपिंग

कऱ्हाड - कृष्णा नदीपात्रालगतच पालिकेने सुरू केलेले कचऱ्याचे डंपिंग.
कऱ्हाड - कृष्णा नदीपात्रालगतच पालिकेने सुरू केलेले कचऱ्याचे डंपिंग.

कऱ्हाड - येथील कृष्णा नदीलगतच्या सखल भागात आता पालिकेनेच कचऱ्याचे डंपिंग सुरू केले आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या प्रदूषणात वाढच होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेऊन शहरात कोपरा अन्‌ कोपरा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतलेल्या पालिकेनेच नदीकाठावर कचरा डंपिंग करून प्रदूषण वाढविले आहे. 

अगोदरच टेंभू योजनेसाठी अडवलेले पाणी, शहरासह परिसरातील तेरापेक्षा जास्त ठिकाणांहून मिसळणारे सांडपाणी व रसायनमिश्रित पाणी नदीत येण्याने प्रदूषणाची समस्या कायम असताना, आता पालिकाच नदीपात्रालगत कचरा डंपिंग करत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

शहरात पालिकेने स्वच्छतेचा डंका पिटला आहे. स्वच्छ सर्वेक्षणामुळे शहरातील अनेक भागांत स्वच्छताही झाली. त्या उपक्रमात लोकसहभागही वाढतो आहे. पण, ते करत असतानाच पालिकेने कृष्णा नदीच्या पात्रालगत अवघ्या शंभर ते दीडशे फुटांपासून अलीकडे पालिकेने कचऱ्याचे डंपिंग केले आहे. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. कचरा डंपिंगसाठी बारा डबरी परिसर असतानाही पालिकेने त्याचे नियोजन केले नसल्याचा हा परिणाम आहे काय? असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

येथील शनिवार पेठेतील रणजित टॉवर, दत्त चौकातील साईमंदिर अशा भागातही पालिकेने कचऱ्याचे डंपिंग केले आहे. दोन्ही ठिकाणच्या नागरिकांचा त्याला विरोध झाला होता. ती गोष्ट अद्यापही ताजी असतानाच पालिकेने स्मशानभूमीपासून खाली जाणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रालगतचा सखल भाग भरण्यासाठी कचऱ्याचे डंपिंग सुरू केले आहे. त्यामुळे त्या डंपिंगने शहरातील नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होणार आहे. 

कृष्णा नदी स्वच्छतेसाठी पालिकेने अद्यापही काहीच उपाय हाती घेतलेले नाहीत. मध्यंतरी कन्यागत पर्व काळात दोन कोटींच्या आसपास निधी दिल्याची चर्चा झाली. मात्र, तो निधी कोणासाठी वापरला गेला, असा प्रश्न पडावा, अशी येथे स्थिती आहे. कन्यागत पर्वातून आलेला निधी कशासाठी वापरला, याचे स्पष्टीकरण अद्यापही झालेले नाही. त्यातच कृष्णा नदी सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी, जलपर्णीचा धोका, टेंभूसाठी पाणी अडविल्याने होणारे प्रदूषण अशा अनेक समस्यांच्या गर्तेत असतानाच आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर एकही उपाय आखला गेला नसतानाच पालिकेच्या कचऱ्याच्या डंपिंगने नवी समस्या उभी केली आहे. त्याची दखल प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडूनही घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

बांधकाम साहित्याचा कचरा स्मशानभूमीपासूनच्या खालील सखल भागात टाकून तो भरून घेतला जात आहे. त्यामुळे तो भाग भरावाने भरला जाईल. चुकून कचरा गेला तरी पालिकेच्या जेसीबीने तो कचरा वेगळा करून पुन्हा उचलला जात आहे.
- मिलिंद शिंदे, आरोग्य अधिकारी, कऱ्हाड पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com