
सेवा बजावत असताना जवान नरळेंनी शनिवारी आपल्या आईशी फोनवरून संवाद साधला होता.
Indian Army : कुपवाडच्या जवानाचं पश्चिम बंगालात निधन
कुपवाड : कुपवाड (ता. मिरज जि. सांगली) येथील रवींद्र नारायण नरळे (वय 39, रा. अहिल्यानगर, न्यू विजयनगर) या भारतीय सैन्यातील (Indian Army) जवानाचे पाणागड राज्य-पश्चिम बंगाल येथे सेवा बजावताना अकस्मात निधन झालं. नरळे आर्मी मेडिकल कोअर (AMC) 189 मिलीटरी हॉस्पिटल पाणागड (Panagarh West Bengal) येथे नाईक या पदावर सेवा बजावत होते.
याबाबत त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेली माहिती अशी, मयत जवान रवींद्र नरळे (Jawan Ravindra Narale) मुळ गोंधळेवाडी ता. जत, जि. सांगलीचे आहेत. कुपवाड (ता. मिरज) येथील अहिल्यानगर, न्यू विजयनगर कुपवाड भागात कुटुंबीयांसह वास्तव्य करत होते. कारखाना परिसरातील शांतीनिकेतन विद्यालयामध्ये त्यांनी इयत्ता दहावी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर सन 2005 साली ते भारतीय सैन्यदलात भरती झाले.
हेही वाचा: Indian Army : जवान प्रथमेश पवार यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
श्रीनगर (जम्मू काश्मीर), पुणे (महाराष्ट्र), जालंदर (पंजाब), जोशी मठ (उत्तराखंड), पाणागड (पश्चिम बंगाल) या विविध ठिकाणी त्यांनी भारतीय सैन्यदलात सतरा वर्षे दीर्घकाळ सेवा बजावली. पश्चिम बंगालच्या पाणागड येथे सेवा बजावत असताना त्यांच्या अकस्मात निधनाची घटना घडली. घटनेची माहिती रविवारी जवान नरळे यांच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी नातेवाईकांसह आक्रोशाचा हंबरडा फोडला. कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. त्याचे पार्थिव पाणागडहून पाठविण्यात आलं असून मंगळवारी अंत्यविधीसाठी सांगली येथे दाखल होणार आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
हेही वाचा: आम्ही शहीद कर्नलच्या रक्ताचा बदला घेऊ; राष्ट्रपतींचा थेट इशारा
'आई मी सुट्टीवर येणार आहे'
सेवा बजावत असताना निधन झालेल्या जवान रवींद्र नरळे यांनी शनिवारी आपल्या आईशी फोनवरून संवाद साधला. पाच ते सहा महिन्यांपासून घरी परतण्याची वाट पाहणाऱ्या आईला त्यांनी फोनवरून दिलासा दिला होता. त्यावेळी ते म्हणाले 'आई मी लवकरच सुट्टीवर येणार आहे तू काळजी करू नकोस. सांगलीला येण्यासाठी गाडीमध्ये बसताच मी तुला फोन करेन' जवान नरळे यांचा त्यांच्या आईशी तो शेवटचा फोन होता.
Web Title: Kupwad Jawan Ravindra Narale Dies In West Bengal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..