पाझर तलावांच्या दुरुस्तीच्या प्रश्नाकडे लक्ष देणार कोण?

हेमंत पवार
बुधवार, 4 एप्रिल 2018

पाझर तलावांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. संबंधित तलावांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्यास त्यामध्ये चांगला पाणी साठा होईल. तो साठा उन्हाळ्यातील टंचाईवेळी उपयोगी पडून टंचाई कमी करण्यास त्याचा हातभार लागेल. 
- अ. शी. पदमाळे, उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग

कऱ्हाड : दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेतून पाझर तलाव तयार करण्यात आले. मात्र त्यांना अल्पावधीतच गळती लागल्याने दरवर्षी पावसाळ्यात त्यात साठणारे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून तलावांच्या दुरुस्तीसाठी जलयुक्त शिवार आणि जिल्हा नियोजन समितीचा निधी वगळता शासनाकडून आजअखेर स्वतंत्र निधीच मिळालेला नाही. कोट्यावधी लीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या बंधाऱ्यांना लागलेली गळती काढल्यास उन्हाळ्यातही पाणी साठा शिल्लक राहुन त्या तलावाच्या परिसरातील शेकडो एकर जमिन पाण्याखाली येण्यास मदत होणार आहे.  मात्र या तलावांच्या दुरुस्तीच्या प्रश्नाकडे लक्ष कोण देणार हाच पश्न सध्या उभा आहे.

दुष्काळामध्ये लोकांच्या हातांना काम देण्यासाठी आणि त्यातून तलावांची भरीव स्वरुपाची कामे होवुन दुष्काळावर मात करण्यासाठी पाणीसाठा निर्माण व्हावा या उद्दात्त हेतुने १९७२ मध्ये रोजगार हमी योजनेतून पाझर तलावांची निर्मीती करण्यात आली. त्या तलावांची निर्मीती झाल्यावर काहीकाळ त्यामध्ये पाणी साठा चांगला होवुन परिसरातील विहीरींची पाणी पातळी चांगली वाढली होती. त्याचा शेतीसाठी चांगला उपयोग झाला. मात्र कालांतराने संबंधित तलावांना गळती लागली. संबंधित तलावांची योग्य पध्दतीने निर्मीती न केल्याने अल्पावधीतच त्या तलावांना गळती लागली. ती दुरुस्ती करण्यासाठी गेल्या ४६ वर्षात स्वतंत्र निधी देण्यात आला नाही. त्यामुळे ती गळती आजअखेरही कायमच आहे. जिल्ह्यातील काही पाझर तलावांची जलयुक्त शिवार अभियानातुन आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतुन यातील काही तलावांची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध झाला. त्यामुळे संबंधित तलावात चांगला पाणी साठा होवुन उन्हाळ्यातही त्यामध्ये पाणी साठुन त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होत आहे. मात्र उर्वरीत अनेक बंधारे मात्र गेल्या अनेक वर्षापासून दरुस्तीसाठी निधीच्याच प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दरवर्षीच्या पावसाळ्यात संबंधित तलावात साठणारे कोट्यावधी लिटर पाणी वाया जात असुन त्यामुळे नैसर्गिक साधनसंपतीचेच नुकसान होत आहे. शासनाकडुन संबंधित तलावांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध केला जात नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संबंधित तलावांच्या दुरुस्तीचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडला आहे. 

पाझर तलावांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. संबंधित तलावांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्यास त्यामध्ये चांगला पाणी साठा होईल. तो साठा उन्हाळ्यातील टंचाईवेळी उपयोगी पडून टंचाई कमी करण्यास त्याचा हातभार लागेल. 
- अ. शी. पदमाळे, उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग

Web Title: lake issue in Karhad