दहिवडीत उपअधीक्षकांसह निम्मी पदे अद्याप रिक्तच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

दहिवडी - माण तालुक्‍यातील भूमिअभिलेख कार्यालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ ठरत आहे. या कार्यालयात मंजूर २० पदांपैकी उपअधीक्षकांसह ११ पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. अनेक प्रलंबित कामांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, दुसऱ्या बाजूने या कार्यालयाला एजंटांचा विळखा पडल्याचे दिसून येते.

दहिवडी - माण तालुक्‍यातील भूमिअभिलेख कार्यालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ ठरत आहे. या कार्यालयात मंजूर २० पदांपैकी उपअधीक्षकांसह ११ पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. अनेक प्रलंबित कामांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, दुसऱ्या बाजूने या कार्यालयाला एजंटांचा विळखा पडल्याचे दिसून येते.

तालुक्‍यातील १०६ महसूल गावांना सेवा देणाऱ्या येथील भूमिअभिलेख कार्यालय नेहमीच चर्चेत राहिले आहे. या कार्यालयातील ११ पदे रिक्त आहेत. त्यातील उपअधीक्षकांचे पद गेल्या वर्षापासून रिक्त आहे. कनिष्ठ लिपिक एक, भू- करमापकच्या मंजूर तीन पदांपैकी तीनही पदे रिक्त आहेत. नगरभूमापन लिपिक, प्रतिलिपी लिपिक, शिपाई दोन, तर आवक-जावक लिपिक हजर होण्यापासूनच पुणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने निलंबित आहे. काही पदे दोन-तीन वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे या कार्यालयाला कोणी वाली आहे की नाही, असा सवाल उपस्थित होतो.

उपअधीक्षक हे पद वर्षभरापासून रिक्त असून खंडाळा येथील उपअधीक्षक गोफणे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. मंगळवारी व शुक्रवारी ते असतात, तर कधी त्यांना बैठक असल्यास अनुपस्थित असतात.  

भूमिअभिलेख कार्यालयातून शेतजमीन मोजणी, जमिनीचे नकाशे, भू-संपादनाची मोजणी, न्यायालयातून आलेल्या प्रकरणांचे निर्गतीकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या मोजणी, खरेदी-विक्री वारसा वाटणी नोंदी व त्या संदर्भातील दाखले नमुने देण्याचे काम केले जाते.

जमिनीच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांना भूमिअभिलेख कार्यालयाची पायरी चढावी लागते. पण, एका कामासाठी लोकांना हेलपाटे मारावे लागतात. येथील अधिकारी व कर्मचारी केव्हा येणार, हे कोणालाच माहीत नसते तर अनेक कर्मचारी मोजणीच्या नावाखाली कार्यालयात फिरकत नसल्याची चर्चा आहे. लवकर मोजणी करावयाची असल्यास त्यांना एजंटांमार्फत व काही सरकारी बाबूंना चिरीमिरी देऊन लवकर मोजणी करून घ्यावी लागते.

...अशी आहे स्थिती
 २० पदांपैकी उपअधीक्षकांसह ११ पदे रिक्त 
 तालुक्‍याला एकही भू-करमापक नाही 
 लोकप्रतिनिधींचे या कार्यालयाकडे दुर्लक्ष 
 कार्यालयाला एजंटांचाही विळखा
 कार्यालयात कोणीच भेटत नसल्याने जनतेची ससेहोलपट 
 अनेक पदे दोन-तीन वर्षांपासून रिक्त

Web Title: Land records office empty post