मंदिराच्या आवारातच केले जाते मृत व्यक्तीचे दफन

uplai
uplai

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांचा अमूल्य ठेवा गावांनी जपलाय. बहुतांश गावच्या रूढी आणि परंपरांमुळे त्या गावची वेगळी ओळख निर्माण होत असते. या रूढी आणि परंपरांच्या पाठीमागे असलेल्या चांगल्या कल्पना, वागणूक, संस्कृती या महत्त्वाच्या बाबी विसरता येत नाहीत. गावाला शांतता लाभावी, सुख – समाधान लाभावे ही गावकर्‍यांची इच्छा त्यांच्या कृतीतून जेव्हा स्पष्ट होते. तेव्हाच त्यांच्या परंपरांना एक वेगळा साज चढतो. हिंदु धर्मांत शांतीचे, श्रध्देचे स्थान म्हणजे मंदिर. त्यामुळे हि मंदिरे स्मशानभुमीपासुन लांब व गावच्या मध्यभागी उभी असतात. या मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी एखाद्या कुटंबातील व्यक्ती मयत झाली तर त्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती घरातील देवपूजाही करत नाही. व गावातील मंदिरातही काही दिवस जात नाही. परंतु या सर्व गोष्टींना माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा हे गाव अपवाद आहे. येथे एक धार्मिक परंपरा असुन, या गावात मंदिराच्या आवारातच मृत व्यक्तींचे दफन केले जाते.

माढा-सोलापुर रस्त्यावर पाच हजार लोकसंख्येचे असलेले गाव. येथील प्रसिध्द देवस्थान खेलोबा देवाच्या नावावरून या गावला अंजनगाव खेलोबा असे म्हटले जाते. सतियुगाच्या काळात मयन्नाप्पा वाघमोडे-पाटील हे मेंढर राखत असताना त्यांच्या भक्तीमुळे  त्यांना विठ्ठल बिरूदेव प्रसन्न झाला. व याच विठ्ठल बिरूदेवाने मयन्नापा यांच्यासाठी सध्याच्या अंजनगाव येथे गादी तयार केली. व तेथे मयन्नापा यांनी समाधी घेतली. त्यावेळी येथे लोकवस्तीही नव्हती. मंदिराची स्थापना झाल्यानंतर जवळपास राहणारी वस्त्यांवरील नागरिक येथे या मंदिराच्या जवळ वास्तव्य करू लागले. मंदिराचे मानकरी, वशंज म्हणुन सर्वस्व जबाबदारी वाघमोडे घराण्याकडे आली. त्यामुळे या घरातील स्त्री-पुरूष कोणीही परगावी मयत झाले तर त्या व्यक्तीची शव त्या ठिकाणी दफन करून समाधी उभारली जाते. परंतु गावात या घराण्यातील व्यक्ती मयत झाली तर त्या व्यक्तीच्या शवाची समाधी इकडे तिकडे उभी न करता या मंदिराच्या आवारात हिंदु संस्कृतीप्रमाणे विधी करून अग्नी न देता दफन केली जाते. ही या गावाची धार्मिक परंपरा असुन दफन केलेल्या ठिकाणास सध्या बाहुल्या असे संबोधतात. एकीकडे महिलांना मंदिरात प्रवेश नाकारला जातो. तसेच मयत व्यक्तीच्या घरातील सदस्य 'सुतक' म्हणून मंदिराची पायरीही चढत नाही. अशा सर्व गोष्टींना येथील रुढी परंपरामुळे चपराक बसत आहे. ही परंपरा मंदिर स्थापनेपासुन सुरू झालेली आहे. कारण विठ्ठल बिरूदेवाचे भाकवचन असुन, ते म्हणतात की, 'चंद्र सुर्य खालत उगवतय वरती मावळतय, नद्या सवाश्या वाहतात'. तोपर्यंत असेच चालणार आहे. 

या खेलोबाच्या मंदिराच्या भोवती तटबंदिची भिंत उभी असुन मंदिरात या बाहुल्या व देवाचे मंदिर जवळ-जवळ आहे. हे मंदिर इतिहासातील अनेक घटनांचे साक्षीदार आहे. अफजलखान जेंव्हा महाराष्ट्रातील मंदिराची तोडफोड करत आला होता. त्यावेळी येथील पुजार्यांनी या मंदिराची मोडतोड होऊ नये याकरिता त्याकाळी मंदिरास दगड व विटा लावुन वरती गाडगे मडकी ठेवुन मंदिरास पांढरा रंग दिला होता. जेणेकरून अफजलखानाची नजर या मंदिरावर पडु नये. अनेक संकटाशी सामना करून हे मंदिर आज उभे आहे. सध्या दवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात येथे यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. अशी माहिती शुक्राचार्य सुखदेव विश्वनाथ वाघमोडे महाराज यांनी दिली. या खेलोबाच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर मृत व्यक्तीचे दफन मंदिराच्या आवारात केल्याचे पहाताच भाविकांना नवल वाटते. तर ग्रामीण भागात क्वचितच ठिकाणी अशी घटना पहायला मिळते.

मंदिरात शव दफन करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. तीच प्रथा तशीच पुढे चालु आहे. या देवस्थानच्या अनेक रूढी परंपरा आजही गावात पाळल्या जातात.
- आप्पाराव वाघमोडे, सरपंच अंजनगाव खेलोबो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com