साताऱ्याचे 'हे' नेते चालले पुन्हा राष्ट्रवादीत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) यामुळे आमचे नागरिकत्व धोक्‍यात येणार आहे. त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये जात असल्याचे लक्ष्मण माने यांनी नमूद केले.

पुणे : भटक्‍या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष तथा "उपरा'कार लक्ष्मण माने हे कार्यकर्त्यांसह 12 एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीही राष्ट्रवादीत विलीन होणार आहे. 
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ""वंचित समाजाचे प्रश्‍न सत्तेशिवाय सुटत नाहीत. मग ती सत्ता आमच्या किंवा आम्हाला मदत करणाऱ्यांच्या हातात हवी म्हणून आम्ही राष्ट्रवादीला मदत केली. आमची संघटना आणि महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी या पक्षातील सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये आमचा पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे,'' असे माने यांनी सांगितले.
 
""केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) यामुळे आमचे नागरिकत्व धोक्‍यात येणार आहे. त्यामुळे समाजात जागृती करण्यासाठी वाड्यावस्त्यांवर "भटक्‍या विमुक्त, वंचितांच्या नागरिकत्वाची शोधयात्रा 12 मार्चला कऱ्हाडपासून प्रारंभ करणार आहे. यात्रेचा शेवट 12 एप्रिल रोजी बारामतीत होईल,'' असे माने म्हणाले. 

प्रकाश आंबेडकरांवर नाराजी
 
राज्यातील राजकीय पक्षांकडे विचारधारांचे पक्ष म्हणून नाही, तर त्या-त्या जातीचे पक्ष म्हणून पाहिले जाते, ही दुर्दैवाची बाब आहे. भटक्‍या विमुक्त जमातीची संख्या जरी जास्त असली, तरी मतदारसंघांमध्ये ती विखुरलेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने एक राजकीय प्रयोग करण्यात आला; पण त्यातही आमची निराशा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानातून नागरिकत्व दिले, कष्टाची भाकरी मिळवून दिली. त्यांच्याबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे. मला त्यांच्या वंशजांबद्दल बोलायचे नाही, असे म्हणत लक्ष्मण माने यांनी नाव न घेता "वंचित'चे प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

वाचा : जय शिवराय ! अखेर शिवप्रेमींनी करुन दाखवलंच

वाचा : येथे थालीपीट,पुरणपोळीपासून बिर्याणीपर्यंत सारे काही

अवश्य वाचा : लई भारी ! विद्यार्थ्यांनी दोन लाख परत केले

सविस्तर वाचा : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार शुक्रवारी यासाठी साताऱ्यात येणार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laxman Mane Will Join Nationalist Congress Party