esakal | विद्यार्थ्यांनो या... विज्ञान विश्‍वात दंग व्हा
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनो या... विज्ञान विश्‍वात दंग व्हा

रयत सायन्स ऍण्ड इनोव्हेशन ऍक्‍टिव्हिटी सेंटरचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 14) सकाळी 11 वाजता वर्ये येथे होणार आहे. त्यानंतर साताऱ्यात दुपारी 12 वाजता संस्थेच्या आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे नामकरण व उद्‌घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होईल.

विद्यार्थ्यांनो या... विज्ञान विश्‍वात दंग व्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : विद्यार्थ्यांनो या..! स्वतः प्रयोग करा आणि विज्ञानाच्या विश्‍वात दंग व्हा... खेळत खेळत वैज्ञानिक व्हा..! अशी साद आता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेकडून घातली जाणार आहे. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग स्वतः करता यावेत, त्यांना विज्ञानाची सहज ओळख व्हावी, यासाठी अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पश्‍चिम महाराष्ट्रातील दर्जेदार आणि सुमारे पाच कोटी रुपये खर्चून "रयत'ने वर्ये (ता. सातारा) येथे उभारलेले "रयत सायन्स व इनोव्हेशन ऍक्‍टिव्हिटी सेंटर' आता सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे.
 
शासनाच्या राजीव गांधी सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी कमिशनच्या माध्यमातून संस्थेने हे विज्ञान केंद्र उभारले आहे. मुंबई येथील होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन यांचाही त्यामध्ये सहभाग आहे. त्यासाठी उभारलेल्या कलात्मक इमारतीत चार कक्ष असून, त्यामध्ये सायन्स, गॅलरी, इनोव्हेशन हब व ऍक्‍टिव्हिटी सेंटर, इनडोअर व आउटडोअर एक्‍झिबिटस, विविध मॉडेल, विज्ञान खेळणी उभारण्यात आली आहेत. मानवी उत्क्रांती आणि यांत्रिक खेळण्यांचाही यामध्ये समावेश आहे, तसेच भारताच्या जीएसएलव्ही या अंतराळ यानाची 20 फूट उंचीची हुबेहूब उभारण्यात आलेली प्रतिकृती विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विश्‍वात घेऊन जाणारी आहे. मुंबई येथील नेहरू सायन्स सेंटरच्या धर्तीवर हे केंद्र उभारण्यात आल्याची माहिती, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील आणि सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी दिली.
 
पाचवीतील विद्यार्थ्यांपासून ते संशोधक विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पनांना हे सेंटर वाव देणार आहे. प्राथमिक शाळेत शकलेले "तरफ', "गती'च्या बाबतीतीलच नव्हे, तर रोबोट तयार करण्यापर्यंतची येथे सुविधा आहे. या केंद्रात विज्ञान तंत्रज्ञानाचे विद्यार्थी स्वतः उपकरणे निर्मिती करू शकणार आहेत. त्यासाठी हॅंडसॉन ट्रेनिंग दिले जाणार आहे. या केंद्राला भेट देण्यासाठी शहर व परिसरातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. "रयत'शिवाय इतर संस्थांच्या 50 शाळा या केंद्राशी जोडल्या जाणार आहेत. हे सेंटर सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खुले असणार आहे. या केंद्रासाठी राज्य आणि केंद्र शासनानची मदत मिळाल्याची माहिती कार्याध्यक्ष डॉ. पाटील यांनी दिली. 

रयत सायन्स ऍण्ड इनोव्हेशन ऍक्‍टिव्हिटी सेंटरचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 14) सकाळी 11 वाजता वर्ये येथे होणार आहे. त्यानंतर साताऱ्यात दुपारी 12 वाजता संस्थेच्या आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे नामकरण व उद्‌घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, मंत्री दिलीप वळसे पाटील, विश्‍वजित कदम, माजी खासदार रामशेठ ठाकूर, राजीव गांधी सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी कमिशनचे सचिव अनिल मानेकर, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र देशमुख, संचालक डॉ. कृष्णास्वामी सुब्रह्मण्यम, वरळी येथील नेहरू सेंटरचे शिवप्रसाद खेणेद, राजीव गांधी सायन्स सेंटरचे सल्लागार डॉ. अरुण सप्रे, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष ऍड. भगिरथ शिंदे, सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जरुर वाचा : विद्यार्थ्यांनी दोन लाख परत केले

नक्की वाचा : सज्जनगडावर आता रोप वे ?

हेही वाचा : स्मशानातील एक मायेचा प्रसंग


अवश्य वाचा : संपत्तीच्या हव्यासापोटी सारेकाही