दाभोलकर, पानसरेंचे विवेकी विचार पटत का नाहीत? - देशमुख

दाभोलकर, पानसरेंचे विवेकी विचार पटत का नाहीत?  - देशमुख

विटा - देशाची श्रीमंत इंडिया विरुद्ध गरीब भारत अशी विषम आर्थिक फाळणी झाल्याने ग्रामीण युवक अस्वस्थ आहे. तो निराश, दैवाधीन, अंधश्रद्धाळू होत व्यसन, गुन्हेगारीकडे वळला आहे. या भागातील सुधारक, पुरोगामी विचारवंत असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विवेकी, विज्ञाननिष्ठ विचार तरुणांना का पटत नाहीत, असा सवाल करून संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दुष्काळ, दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार, आत्महत्या अशा विविध विषयांवर चौफेर मांडणी केली. 

साहित्य सेवा मंडळ, मुक्तांगण वाचनालय व भारतमाता ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित ३७ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून श्री. देशमुख बोलत होते. 
पु. ल. देशपांडे व गदिमा यांची जन्मशताब्दी चालू असतानाही त्यांच्या नावे जल्लोष करावा, अशी परिस्थिती नसल्याचे स्पष्ट करून ते  म्हणाले, ‘‘सर्वत्र दुष्काळी स्थितीने पाणी, चाराटंचाई निर्माण झाली आहे. बळिराजाची जगण्याची, लेकराबाळांना जेवू घालण्याची व पैशाअभावी त्यांचं शिक्षण बंद पडू नये, यासाठी धडपड सुरू आहे. जागतिकीकरणाने शेतकऱ्याला विकास, समृद्धी दिली नाही; तर स्वार्थ, स्पर्धा दिली. गावकीतलं प्रेम, आस्था व आपुलकी आटत गेली. शेतमजूर आणि जुनी बलुतेदारी करणारे लोक उपाशी राहू लागलेत. मला एक लेखक म्हणून स्वत:ची नेहमीच शरम वाटते. कारण शेतकरी व जगण्याची लढाई रोज लढणाऱ्या व पराभूत होणाऱ्या, प्रसंगी आत्महत्या करणाऱ्या सामान्य माणसाचं दु:ख मी कमी करू शकत नाही.’’ 

संमेलनाचे उद्‌घाटक आमदार रामहरी रुपनवर म्हणाले, ‘‘आपण जिवंत माणसावर प्रेम करत नाही. आजही पु.लं.सारखी देवमाणसं आहेत, त्याकडे आपण पाहत नाही. माणसातील कृतज्ञता कमी झाली आहे. ज्यांच्या पायाला हात लावावेत असे पायच दुर्मिळ झाले आहेत. सकारात्मक विचाराने माणसातला देवमाणूस ओळखायला शिकले पाहिजे.’’ 

स्वागताध्यक्ष ॲड. महेश शानभाग यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रघुराज मेटकरी यांनी केले. या वेळी डॉ. ऋषीकेश मेटकरी, कवी नामदेव भोसले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com