नेत्यांचा मुंबईत तळ; कार्यकर्ते सैरभैर

Leaders base in Mumbai
Leaders base in Mumbai
श्रीगोंदे (नगर) : विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 ऑक्‍टोबरला मतदान होईल. मतदानासाठी अत्यंत कमी कालावधी शिल्लक राहिलेला असतानाही, प्रचाराने अजून जोर धरलेला नाही. भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने, कोणाला उमेदवारी मिळेल, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी नेते मुंबईत अन्‌ कार्यकर्ते संभ्रमात, अशी अवस्था श्रीगोंदे मतदारसंघात झाली आहे.

श्रीगोंद्यात पाच वर्षांत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप, असाच संघर्ष राहिला. याही वेळी आमदार राहुल जगताप यांच्या विरोधात भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते मैदानात उतरतील, अशीच दाट शक्‍यता आहे; मात्र कॉंग्रेस नेत्या अनुराधा नागवडे यांनी मुंबईत नातेवाईक आणि वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने लावलेली "फिल्डिंग' त्यांच्या उमेदवारीची आशा पल्लवित करणारी आहे. कदाचित नागवडे हेदेखील भाजपचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे.

भाजपच्या उमेदवारीवर आजही पाचपुते यांचा दावा मजबूत मानला जातो. गेल्या पाच वर्षांत त्यांनी दाखवलेला संयम आणि तालुक्‍यात वाढविलेली संघटना, यामुळे उमेदवारीसाठी त्यांची बाजू उजवी आहे. पाचपुते व नागवडे यांच्यात उमेदवारासाठी रस्सीखेच सुरू असतानाच, "राष्ट्रवादी'चे आमदार जगताप हेदेखील भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचा नेमका उमेदवार कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुक्‍यातील तिन्ही नेते भाजपच्या वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष होत आहे. अवघ्या 27 दिवसांवर आलेली निवडणूक ते विसरले आहेत. मागील विधानसभेच्या तुलनेत या वेळी प्रचारयंत्रणा, त्यासाठीच्या बैठका, यांची मोठी वानवा दिसते आहे. अगदीच शांत वातावरण असल्याने निवडणूक बिनविरोध होते की काय, अशी गमतीशीर चर्चा कट्ट्या-कट्यांवर रंगली आहे.

मतदारांकडे सर्वांचेच दुर्लक्ष
पाचपुते गटाकडून सध्या केवळ विक्रमसिंह पाचपुते लोकांमध्ये जाऊन भाजप व पाचपुते यांची ध्येयधोरणे मांडत आहेत. नेते मुंबईत असल्याने, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनासुद्धा विश्वासात घेतले जात नसल्याने, दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ आहेत. दुष्काळात किमान प्रचाराचे तरी काम मिळेल, या अपेक्षेने निवडणुकीची वाट पाहणाऱ्या कारागिरांना उमेदवारांचा पक्षच निश्‍चित नसल्याने, अजूनही निरोप आले नाहीत. या सगळ्या गोंधळात मतदारांकडे कोणालाही लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे निवडणूक आहे की नाही, अशी चर्चा आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com