युथ कनेक्‍टिव्हिटीसाठी नेत्यांची महाविद्यालयीन मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

प्रत्येक मतदारसंघात इच्छुक उमेदवार विविध कॉलेजवर जाऊन युवा वर्गाशी संवाद साधत आहेत.

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची धूम सुरू झाली आहे. पण, यावेळेस सर्वच इच्छुकांनी तरुण मतदारांना "टार्गेट' करत त्यांच्याशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. यामध्ये विविध कॉलेजांत जाऊन इच्छुक नवमतदार असलेल्या युवकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेत आहेत. यानिमित्ताने युवक-युवती नेत्यांसोबत "सेल्फी' काढून तो "फेसबुक पेज'वर टाकून आमचा नेता...अशी कॉमेंट त्यावर टाकू लागले आहेत. यातून सोशल मीडियावर इलेक्‍शन फिवर जाणवू लागला आहे. इच्छुकांनी 18 ते 25 वयोगटातील नवमतदार "टार्गेट' केल्याने गावोगावी होणाऱ्या मेळाव्यांतही तरुण कार्यकर्त्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.
 

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांत 25 लाख 21 हजार 165 मतदार आहेत. यामध्ये वयोगटानुसार 18 ते 19 वयोगटातील 53 हजार 627, 20 ते 29 वयोगटातील चार लाख 49 हजार 417 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लागेपर्यंत 25 हजार नवमतदार वाढले आहेत. यामध्ये युवक-युवतींची संख्या अधिक आहे. सध्या माहिती, तंत्रज्ञानाच्या युगात युवा वर्गाला महत्त्व आले आहे. त्यानुसार सर्वच पक्षांनी युवकांना केंद्रबिंदू मानून आगामी वाटचाल करण्याची भूमिका घेतली आहे. आता विधानसभा निवडणुकीसह लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्जदाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. त्यासोबतच आता इच्छुकांनी मतदारांपर्यंत पोचून त्यांना आपली भूमिका पटवून देण्यावर भर दिला आहे. या सर्व संपर्क मोहिमेत इच्छुक उमेदवारांनी प्रथम प्राधान्य युवा वर्गाला दिले आहे. यामध्ये नव्याने मतदार झालेल्या या युवक-युवतींची नेमकी भूमिका काय आहे, कोणत्या पक्षाला आणि कामाला त्यांचा प्राधान्यक्रम आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्वच नेतेमंडळी आता युवकांशी संपर्क मोहीम राबवू लागले आहेत. प्रत्येक मतदारसंघात इच्छुक उमेदवार विविध कॉलेजवर जाऊन युवा वर्गाशी संवाद साधत आहेत. त्यांची भूमिका समजून घेऊन आपला पक्ष त्यांच्या भूमिकेबाबत काय निर्णय घेणार, हेही पटवून देत आहेत. त्यामुळे नेतेमंडळी कॉलेजात पोचल्याने युवकांनीही आपल्या आवडीच्या नेत्यांसोबत "सेल्फी' काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करू लागले आहेत. यातून निवडणुकीचा "फिवर' आता सोशल मीडियावरही दिसू लागला आहे. 

यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदयसिंह पाटील, मनोज घोरपडे, शंभूराज देसाई, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, मदन भोसले, जयकुमार गोरे, शेखर गोरे आदी नेत्यांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या दिवसभराच्या प्रचार मोहिमेची सुरवातच युवकांशी संवाद साधण्यापासून होत आहे. त्यामुळे नेहमी आपल्या मतदारसंघात व्यस्त राहणारी ही नेते मंडळी निवडणुकीच्या निमित्ताने कॉलेजच्या आवारात दिसू लागली आहे. तसेच काही मतदारसंघांत होणाऱ्या बैठका, मेळाव्यांनाही युवकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. 
 

विविध तरुण मंडळांना मदत 

दरम्यान, काही मतदारसंघांत इच्छुक गणेश, दुर्गादेवी मंडळे, तरुण मंडळांशी संवाद साधून त्यांना विविध प्रकारच्या साहित्यादी अंगाने मदत करून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तरुणाईची चांदी होणार असल्याचे दिसत आहे. 

वयोगटानुसार जिल्ह्यातील मतदार : 
18 ते 19 : 53,627,  20 ते 29 : 4,49,417,  30 ते 39 : 5,32,225, 
40 ते 49 : 5,22,732 , 50 ते 59 : 3,99,285 , 60 ते 69 : 2,85,743 
70 ते 79 : 1,79,113 , 80 पेक्षा अधिक : 99,023. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leaders' Campaign for Youth Connectivity