रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची सापडली जागा

संदीप खांडेकर
बुधवार, 22 मे 2019

कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची (लिकेज) जागा सापडली असून, पाच टप्प्यांत त्याची चुना, सुरखी (विटांची बारीक पावडर), बेलफळाचे पाणी, वॉटर सॅन्ड मिश्रणाने दुरुस्ती केली जाणार आहे. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर मुबलक साठा होणार आहे.

कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची (लिकेज) जागा सापडली असून, पाच टप्प्यांत त्याची चुना, सुरखी (विटांची बारीक पावडर), बेलफळाचे पाणी, वॉटर सॅन्ड मिश्रणाने दुरुस्ती केली जाणार आहे. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर मुबलक साठा होणार आहे.

रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर गडाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले. गडावर ८४ टाक्‍यांपैकी २१ टाक्‍यांतील गाळ एप्रिल-मे २०१८ रोजी काढला. टाक्‍या पाण्याने पूर्ण भरल्या. हत्ती तलावाची पुरातत्त्व विभागातर्फे ३७ वर्षांपूर्वी डागडुजी झाली होती. तरीही गळतीचा प्रश्‍न कायम होता.

सप्टेंबर २०१८ रोजी पाऊस थांबल्यानंतर तलावातील पाण्याच्या पातळीची नोंद घेतली. तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू झाले. सुमारे १० ते १२ फूट खोल गाळ काढला. कातळ व तलावाची भिंत यांच्या सांध्यातील गळती निदर्शनास आली. भिंतीतील आठ फुटांचा भराव मृतावस्थेत दिसून आला. त्यातून पाणी झिरपत असल्याचे दिसल्यानंतर पुन्हा भराव टाकणे आवश्‍यक झाले.

प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती, कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्‍ट वरुण भामरे व निवृत्त आर्किऑलॉजिस्ट ए. के. सिन्हा यांनी तलावाच्या भिंतीला हानी न होता भराव टाकला गेला पाहिजे, अशी भूमिका घेतली. शिवकाळात तलाव बांधताना ज्या पद्धतीचे मिश्रण वापरले आहे, त्याच पद्धतीचे मिश्रण वापरले जात आहे. गळतीच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर तलावात चार ते पाच फूट पाणी पातळी राहण्याची शक्‍यता आहे. पुढील टप्प्यात लिकेज कोठे आहेत, याची पाहणी करून दुरुस्ती केली जाणार आहे. येत्या दोन-तीन वर्षांत हे काम केले जाईल.

तलावाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तलावाच्या कामानंतर अन्य टाक्‍यांतील लिकेजचा शोध घेतला जाणार आहे.
- वरुण भामरे,
कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्‍ट, रायगड विकास प्राधिकरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leakage in Hatti pond found on Raigad