जिरॅनियमची शेती करण्यासाठी हे जाणून घ्या..

Learn How To Cultivate Geranium Shivaji University Guidelines
Learn How To Cultivate Geranium Shivaji University Guidelines

कोल्हापूर - जिरॅनियम वनस्पतीपासून तेल बनवण्याचे प्रशिक्षण शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाकडून शेतकऱ्यांना आणि उत्पादकांना दिले जाते. मात्र, आपल्या शेती क्षेत्रात या तेल वनस्पती किती टन येतात? त्यातून किती किलो तेल निघेल? निघालेल्या तेलाचा दर्जा कसा आहे? त्याला बाजारपेठेत किती पैसे मिळतील? याचा अंदाज शेतकऱ्यांना नसतो. यासाठी शेतकऱ्यांना शेतात लावलेल्या तेल वनस्पतींपासून किती तेल निघते आणि त्याचा दर्जा काय? हे आता वनस्पती शास्त्र विभागाच्या इन्क्‍युबेशन अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना समजणार आहे. यासाठी आवश्‍यक असणाऱ्या चाचण्या माफक दरात त्यांना करून मिळतील. तसेच हे सुगंधी तेलाला बाजारपेठेत चांगला भाव मिळावा यासाठीही आता विभागाकडून प्रयत्न होणार आहेत. 

बाजारपेठेची मागणी आणि शेतामधील पीक यामध्ये समन्वय असेल तर शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ होईल, असे कृषी तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जाते. मात्र, अद्याप बहुसंख्य शेतकरी पारंपरिक पिके घेऊन शेती करतात. कारण त्यामधून त्यांना हमखास नफा मिळतो. अन्य पिके घेण्यास शेतकरी धजावत नाहीत, कारण त्यांना या पिकांची लागवड, त्यावरील प्रक्रिया, त्याची बाजारपेठ या गोष्टींची संपूर्ण माहिती नसते. यासाठीच शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्र विभागाने एक अभिनव प्रयोग केला. त्यांनी जिरॅनियम वनस्पतीपासून तेल बनवण्याचे प्रशिक्षण काही शेतकऱ्यांना दिले. व त्यांना शेतामध्ये जिरॅनियम वनस्पतीचे तेल घेण्यासाठी प्रोत्साहीत केले. या तेलाचा वापर विविध प्रकारच्या अत्तरांमध्ये केला जाते. अत्तर बनवणाऱ्या कंपन्यांना या तेलाची आवश्‍यकता असते. जिरॅनियम पासून बनवलेल्या तेलाला मागणीही अधिक आहे. सर्व साधारणपणे एका एकरातून ७ ते ८ किलो तेल निघते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून ते अत्तरात वापरले जाते. 

तेलाची उपलब्धता, तेलाचा दर्जा यावरही त्याचा दर अवलंबून असतो. पण शेतकऱ्यांना याची कल्पना नसते. आपल्या शेती क्षेत्रातून किती तेल निघेल व त्याचा दर्जा कसा असेल याची खातरजमा केल्याशिवाय जिरॅनियमची शेती करणे धोक्‍याचे असते. हे ओळखून शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने शेतकऱ्यांना तेलाचा दर्जा तपासण्याच्या चाचण्या अत्यल्प किंमतीत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

रुसा अंतर्गत उभारण्यात आलेल्या इन्क्‍युबेशन अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये या चाचण्या करण्यात येतील. त्यातून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतून आलेल्या जिरॅनियममधून किती किलो तेल निघेल आणि त्याचा दर्जा कसा असेल याची माहिती मिळेल. त्याला किती दर मिळेल याची कल्पना आल्याने शेतकरी आपले आर्थिक ठोकताळे मांडू शकेल. या तेलाला बाजारपेठ मिळावी यासाठी विभागामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. 

जिरॅनियमपासून मिळणाऱ्या तेलाला मागणी अधिक आहे. मात्र, जमिनीचा प्रकार, त्यातून येणारे उत्पादन आणि त्यापासून निघणाऱ्या तेलाचा दर्जा या सर्व गोष्टींची माहिती घेऊनच शेतकऱ्यांनी हे उत्पादन घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांना फायदा तर मिळेलच पण संभाव्य धोकेही टाळता येतील. या दृष्टीने वनस्पतीशास्त्र विभागाने अत्यल्प दरात शेतकऱ्यांना उपलब्ध केलेलेल्या चाचण्या उपयुक्त ठरणार आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. 
- डॉ. मानसिंहराज निंबाळकर,
सहायक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com