चला, घराघरांतील ‘इशान’ शोधू या...!

संभाजी गंडमाळे
मंगळवार, 21 मे 2019

अंध, अपंग, मतिमंद असो किंवा अगदी बहुविकलांग; अशा मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांना स्वतःच्या पायांवर उभं करण्यासाठी काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. स्वमग्न मुलांसाठीही आता विविध संकल्पना पुढे येत असून, आता ‘अध्ययन अक्षमता’ म्हणजेच ‘लर्निंग डिसॲबिलिटी’ असणाऱ्या मुलांसाठी राज्यभरात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. एकूणच अशा मुलांसाठी कोल्हापुरात काय सुविधा आहेत, या  अनुषंगाने घेतलेला वेध....

कोल्हापूर - अध्ययन अक्षमता..लर्निंग डिसॲबिलिटी.. डिस्लेक्‍सिया....हे शब्द जरा जडच वाटतात; पण अकरा वर्षांपूर्वी आलेला आमीर खानचा ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट आणि त्यातला ‘इशान’ आठवला, की लगेचच या शब्दांचा अर्थ उमजतो. घराघरांतील असेच ‘इशान’ शोधण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात शोधमोहीम होणार आहे. निदानानंतर त्यांना तसे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. विशेष म्हणजे अशा मुलांसाठी शैक्षणिक सवलतीही शासनाने दिल्या असून त्याबाबतही मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. 

दरम्यान, ‘सीपीआर’मधील मानसोपचार विभागात चाचणी व त्यानंतर प्रमाणपत्रे देण्याचे काम सुरू झाले आहे. आजवर आठ मुलांना अध्ययन अक्षम असल्याची प्रमाणपत्रे दिली गेली आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. मात्र, मानसोपचार विभागात याबाबतची सर्व माहिती दिली जाते.  

अध्ययन अक्षमता म्हणजे?
अशा मुलांमध्ये कोणतेही शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा बौद्धिक व्यंग नसते. त्यांचा बुद्ध्यांक चांगला असला तरी अभ्यासात ही मुले मागे राहतात. मात्र, ही मुलं म्हणजे विशेष मुलं नव्हेत. मात्र, अध्ययन अक्षम मुलांचे प्रमाण किमान १० टक्के आहे. वाचन, लेखन, गणित, शुद्धलेखन, व्याकरण अशा विविध गोष्टी आत्मसात करता न येणं म्हणजेच अध्ययन अक्षमता. 

काय आहे ‘डीएएलआय’?
अध्ययन अक्षमता समस्येचे निदान करण्यासाठी कोणतीच चाचणी नसल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्थेने २०१३ साली पाच संस्थांची निवड केली. या पाच संस्थांनी ‘डीएएलआय’ अर्थात ‘डिस्लेक्‍सिया ॲसेसमेंट ऑफ लॅंग्वेजीस इन इंडिया’ ही भारतीय भाषांमध्ये निदान करणारी चाचणी विकसित केली.  

अध्ययन अक्षमता तपासणीसाठी
अध्ययन अक्षमता तपासणीसाठी संबंधित शाळेचे मूळ पत्र, पाल्याचे तीन पासपोर्ट साईज फोटो, मानसोपचार ओपीडी केसपेपर, जुने रिपोर्ट व काही आजार असल्यास त्याचे रिपोर्टस्‌, जन्मदाखल्याची झेरॉक्‍स, पाल्याचे ओळखपत्र, पालकांचे ओळखपत्र आणि शाळेतील मागील तीन वर्षांच्या वार्षिक गुणपत्रिकेच्या झेरॉक्‍स ही कागदपत्रे आवश्‍यक आहेत. 

अध्ययन अक्षम असो किंवा स्वमग्न मुलांच्या तपासणीसाठी यापूर्वी मुंबईला जावे लागायचे. पण आता ‘सीपीआर’मध्ये मानसोपचार विभागात या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. राज्यभरात मुंबई, पुण्यानंतर कोल्हापूर आणि सांगलीतच सध्या तरी तपासण्यांनंतर अध्ययन अक्षम असल्याची प्रमाणपत्रे दिली जाऊ लागली आहेत.
- डॉ. पवन खोत,
मानसोपचार विभागप्रमुख, सीपीआर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learning Disability child search in state special report