शिक्षण विभागाच्या "या' अधिकाऱ्यांची पत्नी लढणार विधानपरिषद? 

शिक्षण विभागाच्या "या' अधिकाऱ्यांची पत्नी लढणार विधानपरिषद? 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची बैठक आज वालचंद महाविद्यालयात झाली. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक दिनकर पाटील हे सपत्नीक बैठकीला उपस्थित होते. एवढेच नाही तर बैठकीसाठी आलेल्या मुख्याध्यापकांच्या चक्का नाश्‍त्याची सोय केली होती. चहा-नाश्‍त्याची सोय करण्याइतपत शिक्षण विभाग उदार कसा झाला? बैठक जरी मुख्याध्यापकांची असली तरी त्याठिकाणी चर्चा मात्र शिक्षण संचालक पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील यांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीचीच ऐकायला मिळाली. त्यानिमित्ताने मुख्याध्यापकांचा चांगला पाहुणचारही झाला. 

मुख्याध्यापकांच्या आज झालेल्या बैठकीला जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. शिक्षण विभागाने तसे पत्र पत्रक काढल्याने मुख्याध्यापक सकाळीच बैठकीला हजर झाले. अनेक मुख्याध्यापकांना गर्दीमुळे बसण्यासही जागा मिळाली नाही. काही जणांना समस्या मांडण्याची संधी दिली. पण, हा सगळा कार्यक्रम शिक्षण विभागाचा असला तरी त्या कार्यक्रमात शिक्षण संचालकांच्या पत्नी कशा काय उपस्थित आहेत, अशी चर्चा मुख्याध्यापकांमध्ये सुरू होती. संचालक पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील या कोल्हापूर जिल्ह्यातील एका संस्थेत कार्यरत आहेत. पुढील काही महिन्यात विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे. त्यावेळी श्री. पाटील आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची ओळख व्हावी या हेतूने त्यांनी सपत्नीक बैठकीला उपस्थित राहणे पसंत केले. बैठकीला दोघेही उपस्थित राहिल्यामुळे शिक्षण विभागाच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या बैठकीला केवळ मुख्याध्यापकच उपस्थित नव्हते तर काही संस्थाचालकही महाविद्यालयाच्या आवारात दिसले. श्री. पाटील यांची भेट घेण्यासाठी ते आल्याची चर्चाही बैठकीच्या ठिकाणी सुरू होती. 

श्री. पाटील यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांऐवजी मुख्याध्यापकाच्या भूमिकेत जाऊन मार्गदर्शन केले. अनेक अधिकाऱ्यांची लख्तरे त्यांनी वेशीवर टांगली. केवळ अधिकाऱ्यांचीच नाही तर शिक्षक संघटनांचेही त्यांनी चांगलेच कान टोचले. आज श्री. पाटील यांच्या झालेल्या भाषणाकडे गांभीर्याने पाहिले तर निवडणुकीला सामोरे जाताना नेतेमंडळी ज्याप्रमाणे मतदार राजाची काळजी घेणारे भाषण ठोकतात तशाच प्रकारचे भाषण आज पाटील यांनीही केल्याचे दिसून आले. श्री. पाटील यांनी आपल्या भाषणात मुख्याध्यापकांचे कौतुक करताना मुख्याध्यापक संघटनेला मात्र खडे बोल सुनावले. शिक्षकांची कामे मार्गी लावण्यासाठी संघटना पुढे येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. संघटना एखादा प्रश्‍न घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेली तर ते त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, दुसऱ्याच दिवशी एजंटाकडून ते काम मार्गी लावतात. हा प्रकार गंभीर आहे, याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे. भविष्यात मुख्याध्यापक संघटना काय करते हे दाखवून देण्याचे आव्हानही त्यांनी दिले आहे. यावरून प्रशासन विरुद्ध संघटना असा वाद पेटण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

लेखाधिकारी, अधीक्षकांवर ताशेरे 
श्री. पाटील यांनी जिल्ह्यातील लेखाधिकारी व माध्यमिकचे वेतन अधीक्षक यांच्यावर ताशेरे ओढले. पैसे घेतल्याशिवाय कामच केले जात नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. वेतन पथक अधीक्षकांना शिक्षक सेवानिवृत्त झाल्याच्या दिवशी त्यांना धनादेश दिल्यास अधीक्षकांचा सत्कार करण्यासाठी परत सोलापूरला येण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com