कुत्र्याचा माग काढत बिबट्या थेट घरात!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

ढेबेवाडी (सातारा) : कुत्र्याचा माग काढत बिबट्या घरात घुसल्याची घटना वरचेघोटील (ता. पाटण) येथे काल रात्री साडेअकराच्या सुमारास घ़डली. कुत्र्याच्या आवाजामुळे जाग आलेल्या घरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या तेथून पळून गेला मात्र जाताना त्याने जवळच्याच दुसऱया वस्तीतील घराजवळून एक कुत्रे पळवून नेले. जंगलालगतच्या शिवारात दृष्टीला प़डणारा बिबट्या आता घरात घुसू लागल्याने त्या परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

घोटीलचे युवराज पाटील व ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरमाथ्यावर जंगलाच्या  कुशीत वसलेल्या वरचेघोटील येथे बिबट्यांसह अन्य प्राण्यांचा सतत उपद्रव जाणवतो. आतापर्यंत तेथील अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करून त्यांना फस्त केले आहे. त्याशिवाय रानडुक्करे आणि गव्यांच्या कळपांचाही शेतातील उभ्या पिकांमध्ये सतत धुमाकूळ सुरू असल्याने तेथील शेती अडचणीत आली आहे. काल रात्री तेथील बौध्दवस्तीत साडेअकराच्या सुमारास कुत्र्याचा माग काढत बिबट्या आला. किसन संतू कांबळे यांच्या घरात बांधलेल्या कुत्र्याचा त्याला सुगावा लागल्यानंतर घराची ताटी तोडून त्याने आत प्रवेश करून कुत्र्यावर झडप घातली. यावेळी झालेल्या आवाजाने कांबळे कुटूंबियांना जाग आल्याने त्यांनी घाबरून आरडाओरडा केल्यावर बिबट्या तेथून पळून गेला. मात्र जाताना त्याने जवळच्याच दत्तवस्तीकडे मोर्चा वळवून तेथील श्रीमती खासाबाई पवार यांच्या घराजवळ बांधलेल्या कुत्र्यावर झडप टाकून कुत्रे फरफटत नेले.

पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. घराबाहेर आलेल्या एकाने हा प्रकार पाहिल्यावर आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत बिबट्या कुत्रे घेवून पसार झाला होता. या घटनेमुळे ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण आहे. जंगलालगतच्या शिवारात दृष्टीला पडणारा बिबट्या आता घरात घुसू लागल्याने त्या परिसरात घबराटीचे वातावरण आहे. लोक डोंगरात जनावरे चरायला नेण्यास आणि शेतात जाण्यासही घाबरत आहेत.

Web Title: leopard enters in house in dhebewadi satara

टॅग्स