बिबट्या सहपरिवार आला या मंत्र्यांच्या घरी, खोट वाटतंय, बघा व्हिडिअो 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

मुळा नदीपात्राजवळील डुबीच्या मळ्यातून बिबट्याने शहरात प्रवेश केला. तिळेश्वर मंदिराजवळून बिबट्या भरवस्तीत गल्लीबोळांत शिरला. बिबट्याला पाहून गल्लीतील कुत्री जोरात भुंकू लागली.

राहुरीः बिबट्याने शहरांकडे केव्हाच मोर्चा वळवला आहे. तो कधी पुण्यात दिसतो तर कधी अन्य शहरात. परंतु थेट मंत्र्यांच्या घरी जाण्याचे धाडस बिबट्याने केले आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी आला होता. आज पहाटे ही घटना घडली. 

राहुरीत घबराट

पहाटेची नीरव शांततेत कुत्र्यांचा जोरजोरात भुंकण्याचा आवाज. दमदार पावले टाकत चाललेला बिबट्या. पाठोपाठ चाललेला त्याचा बछडा... हे दृश्‍य आज (शुक्रवारी) पहाटे चार वाजून सात मिनिटांनी राजेंद्र बोरकर यांच्या सीसीटीव्हीत कैद झाले. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे निवासस्थान असलेल्या शहरातील गल्लीत बिबट्याने पहाटे फेरफटका मारल्याचे त्यातून निष्पन्न झाले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

हेही वाचा - नगरमध्ये बॉम्बस्फोट, एक ठार

 

डुबीच्या मळ्यातून आला

मुळा नदीपात्राजवळील डुबीच्या मळ्यातून बिबट्याने शहरात प्रवेश केला. तिळेश्वर मंदिराजवळून बिबट्या भरवस्तीत गल्लीबोळांत शिरला. बिबट्याला पाहून गल्लीतील कुत्री जोरात भुंकू लागली. कुत्र्यांच्या आवाजाने बोरकर यांच्या बंगल्याच्या शेजारी राहणाऱ्या मंदाबाई साठे जाग्या झाल्या. त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी घाबरून घराचा दरवाजा बंद केला.

राज्यमंत्र्यांच्या गल्लीत

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानासमोर बिबट्याने चाचा तनपुरे यांच्या घराजवळील बोळातून मठ गल्लीकडे मोर्चा वळविला. तेथे शेखर वाघ यांना बिबट्याचे दर्शन घडले. मठ गल्लीतील सिन्नरकर यांच्या दुकानासमोरून गणपती घाटाच्या दिशेने बिबट्या गेल्याचे वाघ यांनी पाहिले. पुढे रस्ता मुळा नदीपात्राकडे जातो. भुंकणाऱ्या कुत्र्यांना न जुमानता शहरात भरकटलेला बिबट्या पुन्हा नदीपात्राकडे गेला. 

सीसीटीव्हीत झाला कैद

सकाळी आठ वाजता तनपुरे गल्लीत बिबट्या फेरफटका मारून गेल्याची जोरदार चर्चा झाली. राजेंद्र बोरकर यांनी त्यांच्या बंगल्यावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. त्यात, बिबट्या व त्यापाठोपाठ बछडा घरासमोरून जाताना दिसले. बोरकर यांनी वन अधिकाऱ्यांना माहिती दिली. सीसीटीव्हीचे चित्रीकरण सोशल मीडियात पाठविले. नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. पहाटे चार ते साडेचारदरम्यान शहरातील गल्लीबोळांत बिबट्याने फेरफटका मारल्याने, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Minister of State, Prajakat Tanpure's home