
सागरेश्वर अभयारण्यात नोव्हेबर महिन्यात बिबट्याची एंट्री झाली. तेव्हापासून नागरिक, शेतकऱ्यांत त्याची दहशत आहे.
देवराष्ट्रे (जि. सांगली) : सागरेश्वर अभयारण्यात नोव्हेबर महिन्यात बिबट्याची एंट्री झाली. वन्यजीव विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात तो दिसला. तेव्हापासून नागरिक, शेतकऱ्यांत त्याची दहशत आहे.
मात्र या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची काहीच हालचाल दिसत नाही. एखाद्या जीवाचा बळी गेल्यानंतर हा विभाग जागे होणार का? असा सवाल नागरिक, शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.
बिबट्याने तीन दिवसांपूर्वी सागरेश्वर येथील बिरोबा देवालय येथे देवराष्ट्रे येथील तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तरुणाच्या चलाखीने त्याच्या तडाख्यातून आली सुटका करून घेतली. या घटनेमुळे सागरेश्वर घाटात बिबट्याची दहशत झाली आहे. दुचाकीस्वार, शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
बिबट्या अभयारण्याबाहेर बाहेर आहे याची खात्री झाली आहे. तरीही वन विभागाचे अधिकारी फिरकलेलेच नाहीत. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या या परिसरात शेतीसाठी रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातो. मात्र बिबट्याच्या भीतीने परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळले आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे.
ताकारी योजनेच्या टप्पा क्र. 1 च्या नजीक असणाऱ्या खोलओढा ते बिरोबा देवालय या परिसतात बिबट्या अनेकजणांना दिसला आहे. हा परिसर प्रादेशिक वन विभागाच्याकडे आहे. तरी वन विभागाचे अधिकारी इकडे फिरकले नाहीत आणि बिबट्याला पकडण्यासाठी प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही.
वनविभाग कोणाचा बळी घेतल्यानंतर जागे होणार का? असा सवाल व्यक्त होत आहे. तत्काळ वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या परिसरात येऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
नागरिक जनआंदोलन उभारतील.
राज्यातील बिबट्याचे होणारे हल्ले पाहता वन विभागाने वेळेवर बिबट्याचा बंदोबस्त करावा. अन्यथा परिसरातील नागरिक जनआंदोलन उभारतील.
- विक्रम शिरतोडे, ग्रामस्थ, देवराष्ट्रे
संपादन : युवराज यादव