कुष्ठरोगाचे ग्रहण ६४ वर्षांनंतरही सुटेना

तात्या लांडगे
बुधवार, 17 जुलै 2019

कुष्ठरोग निर्मूलन विभाग २००५ मध्ये बरखास्त केल्यापासून पुरेसे मनुष्यबळ मिळाले नाही. २०२५ पर्यंत राज्य कुष्ठरोगमुक्‍त करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी १३ ते २७ सप्टेंबरदरम्यान कुष्ठरोग शोधमोहीम राबविली जाणार आहे. 
- डॉ. पद्मजा जोगेवार, सहसंचालक, क्षयरोग व कुष्ठरोग, मुंबई

राज्यात दर वर्षी सापडतात ११ हजार कुष्ठरोगी 
सोलापूर - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत विशेष मोहीम सुरू असून, २०२५ पर्यंत राज्यातील कुष्ठरोग हद्दपार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर, नागपूर, ठाणे, रायगड, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमधील कुष्ठरोगाचे ग्रहण ६४ वर्षांपासून सुटले नाही. कुष्ठरोग नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकारकडून तब्बल आठ हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तरीही १४ वर्षांपासून राज्यात दर वर्षी सुमारे ११ हजार कुष्ठरोगी आढळतातच, अशी माहिती राज्याच्या कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन विभागातील सूत्रांनी दिली. 

राज्यात १९५५ मध्ये कुष्ठरोग्यांची मोठी संख्या होती, परंतु १९७८ पासून त्यामध्ये घट झाली. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सर्वोपचार रुग्णालयांची निर्मिती झाल्याने उपचाराची सोय झाली. ग्रामीण भागातील प्रत्येक घरोघरी, तर शहरातील झोपडपट्टी व हद्दवाढ भागातून कुष्ठरोग्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, २००५ मध्ये कुष्ठरोग निर्मूलन विभाग बरखास्त केल्याने मनुष्यबळ कमी पडू लागले. त्यामुळे ‘आशा’ कार्यकर्त्या, ‘एनएचएम’सह अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्‍त कामे करून घ्यावी लागत असल्याने अद्याप सर्व कुष्ठरोग्यांपर्यंत पोचता आले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कुष्ठरोग्यांच्या शोध मोहिमेसाठी दर वर्षी केंद्र व राज्य सरकारकडून सरासरी ३५ कोटींपर्यंत खर्च होत असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leprosy Patient Sickness Health Care