खुंदलापूरच्या पुनर्वसनाबाबत बैठक घेऊ; प्रश्न सोडवू...

शिवाजी चौगुले
Wednesday, 13 January 2021

खुंदलापूरच्या पुनर्वसनासंदर्भात माजी आमदार शिवाजीराव नाईक व जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत संबंधित या पुनर्वसनाबाबत लवकरच बैठक घेऊन तो प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन चौधरी यांनी दिले. 

शिराळा : खुंदलापूरच्या पुनर्वसनासंदर्भात माजी आमदार शिवाजीराव नाईक व जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत संबंधित या पुनर्वसनाबाबत लवकरच बैठक घेऊन तो प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन चौधरी यांनी दिले. 

शिराळा तालुक्‍यातील खुंदलापूर धनगरवाडा येथील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली 25 वर्षे प्रलंबित आहे. चांदोली अभयारण्यातील हिंस्त्र प्राण्यांची भीती आहे. वारंवार जनावरे हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडत आहेत. तर दुसरीकडे अभयारण्यात जनावरे चरावयास गेल्यावर अधिकारी व कर्मचारी त्रास देतात. जळणासाठी लाकूड तोडू देत नाहीत. अशा विचित्र अवस्थेत नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. 

पुनर्वसनाचा आराखडा बनवण्याचं काम व संकलनाचे काम पूर्ण करून आधी जमिनींचा ताबा व भरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना देवून पुनर्वसन करावे. खुंदलापूरसाठी कडेगाव तालुक्‍यातील ऐतगाव व जानाईवाडीसाठी घोगाव (ता. पलूस) येथील जमिनीची पाहणी केली, पण त्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावावा, अशी विनंती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी कदम, तहसीलदार गणेश शिंदे, प्रांताधिकारी नागेश पाटील, मणदूर सरपंच वसंत पाटील, खुंदलापूर माजी सरपंच तुकाराम गावडे, भागोजी डोईफोडे, बाबुराव डोईफोडे, विठ्ठल डोईफोडे, धोंडीबा डोईफोडे, ठकू डोईफोडे, मारुती गिरवाले, रामचंद्र जाधव, मोहन पाटील उपस्थित होते. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's hold a meeting on rehabilitation of Khundlapur