esakal | निकाल कळल्यावर अनेकींना अश्रू आणि संताप अनावर झाला
sakal

बोलून बातमी शोधा

निकाल कळल्यावर अनेकींना अश्रू आणि संताप अनावर झाला

या निकालाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

निकाल कळल्यावर अनेकींना अश्रू आणि संताप अनावर झाला

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारी बाटली आडवी करण्यासाठी वर्षभरापासून मोठ्या धाडसाने उभारलेला लढा अयशस्वी होताना पाहताना काल सायंकाळी ताईगडेवाडी (तळमावले, ता. पाटण) येथे महिलांनी भरलेल्या डोळ्यांनी व्यक्त केलेला प्रचंड संताप तेथील अनेक कुटुंबांना बसत असलेले दारूचे चटके अधोरेखित करणारा ठरला. आडव्या बाटलीच्या बाजूने 282 आणि उभीला केवळ 38 मतदान झालेले असतानाही अयशस्वी झालेल्या या लढ्यातून बोध घेऊन आता ढेबेवाडीतील दारूबंदीच्या लढ्यासाठी सज्ज झालेल्या मंद्रुळकोळे येथील रणरागिणींनी नव्याने रणनीती आखण्याची गरज निर्माण झालेली आहे. 

नव्याने चौपदरीकरण झालेल्या ढेबेवाडी-कऱ्हाड रस्त्यालगतची तळमावले आणि ढेबेवाडी ही दोन्ही ठिकाणे झपाट्याने विकसित होत चाललेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग व व्यवसायांद्वारे बाजारपेठा विकसित होत असताना त्यात परवानाप्राप्त दारू दुकानांचीही भर पडल्याने दोन्ही ठिकाणचे सामाजिक स्वास्थ्य त्यामुळे धोक्‍यात तर आले आहेच, शिवाय आजूबाजूच्या अनेक गावांसह वाड्यावस्त्यांनाही त्याची झळ पोचू लागल्याने दारू विरोधात उघड नसली तरी आतल्या आत मात्र खदखद वाढताना दिसते आहे. गेल्या काही वर्षांपासून ढेबेवाडीत दारूबंदीची चर्चा असली तरी त्याला लढ्याचे स्वरूप मिळत नव्हते. मात्र, गेल्यावर्षी महिलादिनी ताईगडेवाडी-तळमावल्यात त्याची पडलेली ठिणगी आणि पुढे त्या ठिणगीला आलेले मशालीचे स्वरूप अन्य गावांतील रणरागिणींसाठी लढ्याचा आत्मविश्वास वाढवणारे ठरले. वर्षभरात तीन वेळा स्वाक्षऱ्यांची पडताळणी होवूनही तेथील रणरागिणी मागे हटल्या नाहीत. विविध प्रकारे हा लढा दाबण्याचा प्रयत्नही झाला. परंतु, तो संपला नाही.

लई भारी : साताऱ्यातील पोलिसांनी त्याच्या मुसक्‍याच आवळल्या

वाचा : आईच्या पार्थिवाला ज्येष्ठ मुलीने दिला भडाग्नी

तेथे नकतेच  मतदान घेण्यात आले. आडव्या बाटलीच्या बाजूने 282 आणि उभीला केवळ 38 मतदान झाले. 23 मते अवैध ठरली. मात्र, महिलांच्या एकूण मतांपैकी निम्म्यापेक्षा जास्त मते मिळाली तरच बाटली आडवी, असा नियम असल्याने 608 मतांपैकी 305 मतांचा टप्पा गाठू न शकलेल्या आंदोलनकर्त्या महिला निराश झाल्या. दारू दुकानदार आणि त्यांचे समर्थक निकाल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने रात्री तळमावल्यात जमलेले होते, रणरागिणीही तेथे मोठ्या संख्येने बसून होत्या. निकालाचे स्वरूप कळल्यावर त्यातील अनेकींना अश्रू आणि संताप अनावर झाला. आमच्या लढ्याच्या बाजूने एवढी मते मिळूनही बाटली आडवी होत नसेल तर आम्हीच कायदा हातात घेऊन तिला आडवी करतो, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याने पोलिस व नागरिकांनी त्यांची समजूत घालून घरी पाठवले. ताईगडेवाडीतील या दारूबंदीच्या लढ्यातून अनेक प्रश्नही समोर आलेले आहेत. हा लढा संपलेला नाही तर पुन्हा नव्याने जोमाने सुरू झाला आहे. आम्ही हरलेलो नाही, जिंकलोय असे आंदोलनकर्त्या कविता कचरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी "सकाळ'ला सांगितले. तळमावलेच्या लढ्यातून प्रेरणा घेऊन काही दिवसांपासून ढेबेवाडीतील दारूबंदीसाठीही सज्ज झालेल्या मंद्रुळकोळे येथील महिलांनी कालच्या मतदान प्रक्रियेतून बोध घेऊन आणि त्रुटी दूर करून आता नव्याने रणनीती आखण्याची गरज निर्माण झालेली आहे. ढेबेवाडी बाजारपेठेच्या परिसरात मंद्रुळकोळे ग्रामपंचायत कक्षेत पाच दारूदुकाने असून, तेथे महिलांच्या ग्रामसभेत झालेल्या दारूबंदीच्या ठरावानुसार पुढील कार्यवाहीसुद्धा सध्या सुरू आहे. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा...' या धोरणाने राहिल्यास येथे दारूबंदी शक्‍य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

जरुर वाचा : सातारकरांनाे सावधान! जे शनिवारात घडलं ते तुमच्या बराेबरही घडेल

ताईगडेवाडीत खुले मतदान घ्या 

सातारा : ताईगडेवाडी (ता. पाटण) येथे दारूबंदी झालेली मतदान प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. महिलांना घाबरविण्यासाठी मतदान केंद्राबाहेर शंभर एक लोक दारूविक्रेत्यांनी आणून ठेवले होते. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांना निलंबित करावे, तसेच महिलांसाठी खुली मतदान प्रक्रिया पुन्हा राबविण्यात यावी, अशी मागणी येथील महिला व सिताई फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता कचरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
 
दरम्यान, या मागण्यांबाबत योग्य निर्णय न झाल्यास महिला दिनी आठ मार्चला सर्व महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
 
दारूबंदीसाठी (बुधवारी) पाटण तालुक्‍यातील ताईगडेवाडी येथे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने राबविली असल्याचा आरोप करीत येथील महिला व सिताई फाउंडेशनच्या अध्यक्ष कविता कचरे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली आहे. 
या वेळी दिलेल्या निवेदनात महिलांनी म्हटले, की आडव्या बाटलीसाठी काल झालेल्या मतदानात आडव्या बाटलीसाठी 282, तर उभ्या बाटलीसाठी 38 मतदान झाले, तर 23 मते बाद ठरविण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान महिलांना मतदान करता येत नव्हते. कोतवालच महिलांच्या हातून चिठ्ठ्या घेऊन स्वत: बॉक्‍समध्ये टाकत होते. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी गैरवर्तणूक केली असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. दारूबंदी मतदानाबाबत कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन पाटण तहसीलदार कार्यालयाकडून झाले नाही.

हेही वाचा : ...म्हणून अतिक्रमण कारवाईत हवालदाराने लावली जीवाची बाजी

ग्रामपंचायतीला दिलेली मतपत्रिका व मतदान प्रक्रियेवेळी वापरलेली मतपत्रिका यात फेरबदल करण्यात आले. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्राबाहेर दारूविक्रेत्यांनी शंभर लोक सोबत आणून महिलांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. येथील महिलांनी संघर्ष करून 282 मतदान मिळविले असून, अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत गैरप्रकार केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, तसेच दारूबंदीसाठी पुन्हा खुली मतदान प्रक्रिया राबवावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. 
या निवेदनावर कविता कचरे यांच्यासह सुमन ताईगडे, मालन ताईगडे, सीमा ताईगडे, विमल लकडे, सुजाता ताईगडे, भारती ताईगडे, रूपाली ताईगडे, विमल ताईगडे, छाया काटकर, सुनीता भुलूगडे, तारूबाई ताईगडे, वनिता ताईगडे, प्रियांका ताईगडे, छाया ताईगडे, मनीषा ताईगडे यांच्या सह्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

loading image