डॉ. खरात यांच्या स्मारकासाठी सांगलीतील साहित्यक एकवटले

डॉ. खरात यांच्या स्मारकासाठी सांगलीतील साहित्यक एकवटले
डॉ. खरात यांच्या स्मारकासाठी सांगलीतील साहित्यक एकवटलेsakal

सांगली : महाराष्ट्राची साहित्यिक सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत आटपाडीचे सुपुत्र डॉ. शंकरराव खरात यांचे भव्य स्मारक जन्मगावी आटपाडी येथे व्हावे या मागणीचे निवेदन जिल्ह्यातील मराठी कवी लेखक संघटनेच्यावतीने देण्यात आले. डॉ.खरात यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. त्याचे यथोचित स्मारक व्हावे यासाठी प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णयही झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, दलित-वंचितांच्या जीवन साहित्यात आणणारे महत्वाचे लेखक- कथाकार अशी त्यांची ओळख. महार कुटुंबात जन्मलेल्या डॉ.खरात यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अस्पृश्यतेचा दाहक मारा सहन करीत शिक्षण पूर्ण केले. आटपाडीत गावात चौथीपर्यंत ते शिकले. मॅट्रिकचे (अकरावी) शिक्षण घेण्यासाठी ते औंधला गेले, तर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी आपले बी.ए. पूर्ण केले. पुढे त्यांनी वकिली करत दलितांचे खटले लढवत न्याय मिळवून दिला.

डॉ. खरात यांच्या स्मारकासाठी सांगलीतील साहित्यक एकवटले
राजीनाम्यानंतर सचिन सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, चर्चांना उधाण

१९४७-४८ मध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक प्रभावाखाली त्यांनी समाजसेवा करीत साहित्यातही योगदान दिले.‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’च्या माध्यमातून त्यांनी विमुक्त भटक्यांसाठी लढे दिले. विद्यार्थी दशेतच त्यांना बाबासाहेबांचा परीसस्पर्ष लाभला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात भूमिगत कार्यकर्त्यांना पत्रके वाटपाचे काम त्यांनी केले. ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ या संघटनेत काम करता करता त्यांचा कामगार चळवळीत सक्रिय सहभाग वाढत गेला. कामगार चळवळ व उपेक्षितांसाठीच्या अनेक संघटनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत विविध पदे भूषवली. पुढे हे सारे जगणे त्यांनी साहित्यातून मांडले. ‘आज इथं तर उद्या तिथं,’ ‘आडगावचे पाणी,’ ‘गावचा टिनपोल गुरुजी,’ ‘गाव-शीव,’ ‘झोपडपट्टी,’ ’टिटवीचा फेरा,’ ‘तडीपार,’ ‘दौण्डी,’ ‘फूटपाथ नंबर १,’ ‘बारा बलुतेदार,’ ‘मसालेदार गेस्ट हाऊस,’ ‘माझं नाव,’ ‘सांगावा,’ ‘सुटका,’ ‘हातभट्टी’ इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली, तर ‘तराळ-अंतराळ’ हे आत्मचरित्र लिहिले. विविध साहित्य संस्थावर त्यांनी काम पाहिले. १९८४ साली जळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. या बहुरंगी प्रभावी साहित्यकाचे ९ एप्रिल, २००१ निधन झाले.

त्यांचे स्मारक व्हावे यासाठी काही महिन्यापुर्वी त्यांच्या कुटुंबियांनी स्वतःची मालमत्ता विकून ते उभे करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत जिल्ह्यातील साहित्यकांनी एकत्र येत स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. आज त्याची सुरवात म्हणून सुभाष कवडे, अभिजीत पाटील, विलास खरात, ,दयासागर बन्ने,नामदेव भोसले,प्रतिभा जगदाळे,गौतम कांबळे अरूण कांबळे, महेश कराडकर ,संताजी देशमुख, किशोर दिपंकर ,भिमराव कांबळे यांनी निवेदन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com