
बेळगाव : ‘बूस्टर डोस’ला अत्यल्प प्रतिसाद
बेळगाव - कोरोना प्रतिबंधकसाठी राज्यातील १५ जिल्ह्यात ‘बूस्टर डोस’ला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. चौथ्या लाटेबाबत वेगवेगळे मतप्रवाह, खासगी रुग्णालयात बूस्टर डोसची उपलब्धता व शुल्क आकारणी आदी कारणांनी ‘बूस्टर डोस’कडे पाठ फिरवली असल्याचे जाणवते. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १२ हजार नागरिकांनी ‘बूस्टर डोस’ घेतली असून गेल्या पाच दिवसांत केवळ १,२५० जणांना ‘बूस्टर डोस’ मिळाला आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल खबरदारी व ‘बूस्टर डोस’ संदर्भात आदेश जारी झाला आहे. पण, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्यातून १५ जिल्ह्यांत आठवड्यापासून एकही ‘बूस्टर डोस’ दिलेला नाही. त्यात राज्यातील बळ्ळारी, हासन, रायचूर, मंड्या, बिदर, बागलकोट, चित्रदुर्ग, कोलार, हावेरी, कोप्पळ, यादगीर, रामनगर आणि चामराजनगर आदी मिळून पंधरा १५ जिल्ह्यात एक आठवड्यापासून एकही ‘बूस्टर डोस’ दिलेला नाही.
कोरोना वॉरिअर्स, आरोग्य कर्मचारी आणि ६० पेक्षा अधिक वयोगटाला सरकारी रुग्णालयात मोफत बूस्टर मिळते. मात्र, १८ ते ५९ वयोगटाला खासगी रुग्णालयात लस दिली जाते आहे. यासाठी शुल्क आकारणी केली जात आहे. त्यामुळे प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात ४० हजार ५७ जणांनी कोरोनाने जीव गमाविला आहे. पैकी १८ ते ५९ वयोगटातील १७,७०५ जणांचा समावेश आहे. यासोबत ३९.४७ टक्के जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले असून त्यापैकी २८.८३ टक्के जण १८ ते ५९ वयोगटातील आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण होण्यात या वयोगटाची सरासरी टक्केवारी ७३ आहे.
‘बूस्टर डोस’ला ३८६ रुपये
कोरोनापासून बचावासाठी बूस्टर डोस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. मात्र, बूस्टर डोस खासगी रुग्णालयात उपलब्ध आहे. त्यासाठी ३८६ रुपये आकारले जात आहेत. चौथ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढल्यास राज्य सरकारने मोफत लसीकरण सुरू करावे, अशी मागणी आहे.
‘‘कोरोना योद्धा आणि ६० पेक्षा अधिक वयोगटाला सरकारी रुग्णालयात मोफत बूस्टर डोस मिळते. मात्र, १८ ते ५९ वयोगटाला बूस्टर डोससाठी शुल्क आकारणी केली जात आहे. ज्यांना दुसरी डोस घेऊन ९ महिने पूर्ण झाली आहेत. त्यांना बूस्टर डोस घेण्याबाबत कळविले जात आहे. यामुळे अनेक जणांचे ९ महिने पूर्ण झाली नाहीत. यामुळे बूस्टर डोसला प्रतिसाद मिळत नसल्याचे आकडेवारीवरून कदाचीत वाटत असावे.’’
- डॉ. संजीव डूमगोळ, आरोग्य अधिकारी महापालिका.
Web Title: Little Response To Booster Dose In Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..