पशुधन अधिकाऱ्यास लाच घेताना अटक 

Livestock officer arrested for bribe
Livestock officer arrested for bribe


मिरज : शासकीय अनुदानातून शेळी-मेंढी पालनाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मिरज पंचायत समितीमधील तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण सुभाष सवासे याला रंगेहात पकडले. त्याला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. 

राज्य सरकारने अल्पभूधारक मागासवर्गीयांना शेतीपूरक उद्योग करण्यासाठी विविध योजनांखाली अनुदान दिले जाते. त्यासाठीचे प्रस्ताव पंचायत समितीकडून मंजूर केले जातात. अशाच प्रकारे शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय करण्यासाठी तालुक्‍यातील सलगरे गावच्या एका लाभार्थीने मिरज पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवला. डॉ. सवासे याच्याकडे याची सध्या सलगरे येथे पशुधन विकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. परंतु त्याच्याकडेच मिरज पंचायत समितीच्या तालुका पशुधन विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तालुका पशुधन विकास अधिकारी म्हणून डॉ. सवासे यांनी 12 हजार रुपयांच्या लाचेची मागणी 

लाभार्थीकडे केली. याबाबत लाभार्थीने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. लाचलुचपत विभागाने प्रकरणाची खातरजमा करून लाचेची 12 हजार रुपयांची रक्कम आठ हजार रुपयांपर्यंत तडजोडीने ठरवली आणि हीच रक्कम स्वीकारताना आज दुपारी दोनच्या सुमारास डॉ. सवासेला छापा टाकून पकडले. हा छापा पडताच पंचायत समितीत खळबळ उडाली. लाचलुचपतच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सवासे याला तातडीने ताब्यात घेऊन सांगलीला नेले. त्यानंतर त्याला अटक केली.


पूर्वसूचना दिली पण.... 
पशुधन विकास विभागातील लाचखोरीबाबत आठच दिवसांपूर्वीच डॉ. सवासे याला काही ज्येष्ठ पंचायत समिती सदस्यांनी अशा पद्धतीने काम करू नका, अशी सूचना दिली होती. तरीही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही. पंचायत समितीमधील अशा अनेक गैरव्यवहारांबाबत 1 फेब्रुवारीच्या मासिक सभेतही सदस्यांकडून वादळी चर्चा होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com