व्यावसायिक रंगभूमीवर स्थानिक कलाकारांचे ‘हॅम्लेट’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

कोल्हापूर - अभिनेता प्रशांत दामले वसंत सबनीस लिखित ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकातून पश्‍चिम महाराष्ट्राच्या भेटीस येत आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्याबरोबर त्यांनी हे नाटक साकारलं असून बुधवारी (ता. ३) या नाटकाच्या दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. स्थानिक कलाकारांनी साकारलेल्या जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्‍सपिअरच्या ‘हॅम्लेट’चा प्रयोग रविवारी (ता. ७) होणार आहे. एकूणच मे महिन्याचा पहिला आठवडा आशयघन नाटकांची पर्वणी घेऊन येणार आहे.

कोल्हापूर - अभिनेता प्रशांत दामले वसंत सबनीस लिखित ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकातून पश्‍चिम महाराष्ट्राच्या भेटीस येत आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्याबरोबर त्यांनी हे नाटक साकारलं असून बुधवारी (ता. ३) या नाटकाच्या दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. स्थानिक कलाकारांनी साकारलेल्या जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्‍सपिअरच्या ‘हॅम्लेट’चा प्रयोग रविवारी (ता. ७) होणार आहे. एकूणच मे महिन्याचा पहिला आठवडा आशयघन नाटकांची पर्वणी घेऊन येणार आहे.

येथील एम.बी. थिएटर्स आणि परिवर्तन कला फौंडेशनने जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्‍सपिअर यांचे ‘हॅम्लेट’ व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात रविवारी (ता. ७) रात्री नऊ वाजता या नाटकाचा प्रयोग होईल. शेक्‍सपिअर यांनी १६०१ साली लिहिलेले हे सर्वश्रेष्ठ नाटक. नाटक आणि साहित्य या दोन्ही जगात त्याला प्रचंड रसिकमान्यता मिळाली आहे. जगातील श्रेष्ठ नटांना रंगभूमीवर हॅम्लेटचे काम करावेसे वाटते. शेक्‍सपिअरच्या नाटक कंपनीतील लोकप्रिय नट रिचर्ड बरबेजपासून तर आपल्या काळातील लॉरेन्स ऑलिव्हिएपर्यंत जगातील महान नटांनी विविध पद्धतीने हॅम्लेट रंगमंचावर उभा केला आहे, तर डॉ. जॉन्सनपासून सिग्मंड फ्रॉइडपर्यंत अनेक विचारवंतांनी या नाटकातील अंतरंगात दडलेल्या गूढतेचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. परशुराम देशपांडे यांनी या नाटकाचा मराठी अनुवाद केला असून किरणसिंह चव्हाण यांचे दिग्दर्शन आहे. मंदार भणगे, महेश भूतकर, एन. डी. चौगले, हर्षल सुर्वे, स्नेहल बुरसे, हेमंत धनवडे, प्रिया काळे, सुहास भाटकर, केदार अथणीकर, अभिजित कांबळे, रोहित जोशी, अभिजित कांबळे आदींच्या नाटकात भूमिका आहेत. राजेश शिंदे यांचे संगीत आहे. या नाटकाचे राज्यभरात प्रयोग होणार आहेत.   

‘कार्टी काळजात घुसली’ हे नाटक पुनरुज्जीवित असून वडील आणि मुलगी यांच्या नात्यावर आधारित असलेले हे नाटक काहीसे विनोदी आणि गंभीर स्वरूपाचे आहे. मंगेश कदम यांचे दिग्दर्शन असून वसंत सबनीस यांचे लेखन आणि संवाद हे या नाटकाचे मुख्य बलस्थान आहे. विनोदावर जबरदस्त हुकुमत असलेले हे नाटक पंचवीसएक वर्षांपूर्वी लिहिलेलं आणि या आधीही रंगभूमीवर येऊन गेलेले आहे. तरीही मराठी रंगभूमीचा आधार असलेल्या मध्यमवर्गीय प्रेक्षकांच्या भावनांना हात घालणारं आहे. पाश्‍चात्य नाटकावर आधारित; परंतु मांडणीत देशी सत्त्व मिसळलेलं हे नाटक आहे. नाटक लिहिलं गेलं त्यावेळचे नाटकातले काही संदर्भ आज कालबाह्य झाले आहेत. त्यात बदल करून त्यांनी ते वर्तमानाशी जोडून घेतले आहेत; पण माणसाची मूळ प्रवृत्ती बदलत नाही. किंबहुना, ती अधिकच समकालीन झालेली जाणवते. म्हणूनच हे नाटक आजही प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवते. 

बुधवारी (ता. ३) सांगली भावे नाट्य मंदिर, गुरुवारी (ता. ४) केशवराव भोसले नाट्यगृह, शुक्रवारी (ता. ५) इचलकरंजी आणि शनिवारी (ता. ६) सातारा येथे या नाटकाचे प्रयोग होतील.

Web Title: Local artists 'Hamlet' on commercial stage