esakal | लॉकडाऊन... बाऊ करू नका...
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown ... don't get confused

देशात रविवारी जनता कर्फ्यू झाला. त्याचवेळी स्थानिक व्यापाऱ्यांनी मंगळवारपर्यंत (ता. 23) सांगलीत लॉक डाऊन जाहीर केले. तोवर राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत महत्त्वाच्या व अत्यावश्‍यक सेवा वगळता लॉकडाऊनची घोषणा केली. त्याबाबत लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे

लॉकडाऊन... बाऊ करू नका...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देशात रविवारी जनता कर्फ्यू झाला. त्याचवेळी स्थानिक व्यापाऱ्यांनी मंगळवारपर्यंत (ता. 23) सांगलीत लॉक डाऊन जाहीर केले. तोवर राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत महत्त्वाच्या व अत्यावश्‍यक सेवा वगळता लॉकडाऊनची घोषणा केली. त्याबाबत लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. नेमकी कोणती सेवा सुरू राहणार, किती वेळासाठी सुरू राहणार, काय बंद राहणार, याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत. त्याबाबत "सकाळ'ने या सेवा पुरवणाऱ्यांच्या संघटना प्रमुखांशी संवाद साधून पुढील आठ दिवसांची स्थिती कशी राहील, याची मांडलेले हे वेळापत्रक. 

सांगली, मिरजकरांनी गर्दी टाळावी ः साठेबाजीची गरजच नाही 
लॉकडाऊन... शटर डाऊन... संचार बंदी... कर्फ्यू... असे काहीसे नवे शब्द सध्या दररोज कानावर पडत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सक्तीने या उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे लोकांनी घरातच थांबावे लागणार हे स्पष्ट आहे. ते किती दिवस चालेल, हे आताच सांगता येणार नाही. किमान 31 मार्चपर्यंत तरी घोषणा झाली आहे. त्याचा बाऊ करण्याची मात्र अजिबात गरज आहे. बाजारपेठेतील बंदमुळे साठेबाजी करण्याची तर अजिबातच आवश्‍यकता असणार नाही. कारण, सांगली, मिरजेसह प्रमुख शहरे आणि ग्रामीण भागात किराणा साहित्य, दूध, पेट्रोल, औषधे, वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत. अट एवढीच की या ठिकाणी मोठी गर्दी करण्याचे टाळले पाहिजे. गरज असेल तरच आणि घरातील एकानेच या वस्तू खरेदीसाठी बाहेर पडावे. 

हे सुरू राहणार 

  • पेट्रोल पंप ः सकाळी 8 ते सायंकाळी 5 
  • किराणा दुकान ः बुधवारपासून नेहमीच्या वेळेत 
  • मेडिकल ः 24 तास 
  • दूध वितरण ः नेहमीच्या वेळेत 
  • बझार ः बुधवारपासून नेहमीच्या वेळेत 
  • वाहतूक ः अत्यावश्‍यक सेवा, फळे, दूध, भाजीपाला वाहने 

किराणा उद्यापासून सुरू 

""सांगलीत तीन दिवसांच्या बंदला आमचा पाठिंबा असल्याने किराणा दुकाने मंगळवारपर्यंत बंद राहतील. बुधवारपासून दिवसभर दुकाने आणि जीवनावश्‍यक वस्तू मिळणारे बझार सुरू राहतील. येथे पाच- पाच लोक आत सोडणार आहोत. त्यासाठी रांग लावली जाईल. सॅनिटराझर लावून आत पाठवले जाईल. किराणा दुकानांतही हीच शिस्त पाळली जाईल. गेल्या पंधरा दिवसांत लोकांनी किराणा माल भरून ठेवला असल्याने फार गर्दी होईल, असे वाटत नाही.'' 

- अरुण दांडेकर,  ज्येष्ठ व्यापारी, सांगली 

दूध पुरवठा सुरळीत 

दूध उलाढालीवर परिणाम झाला आहे. दूध ही जीवनावश्‍यक आहे. त्यामुळे वितरण आणि पुरवठा हा नियमित रहावा, यासाठी प्रयत्न आहेत. वितरणावर थोडाफार परिणाम झाला आहे. किराणा दुकाने, बेकरी बंद असल्याने 25 ते 30 टक्के परिणाम आहे. जेथे दूध विक्री केंद्र आहे, ते सुरू राहील.

- गिरीश चितळे, चितळे उद्योग समूह, औषधांची 14 तास सेवा 

दोन हजार मेडिकल्स सुरळीतपणे सुरू

अत्यावश्‍यक सेवेमध्ये समाविष्ट असलेली मेडिकल्स दुकाने ग्राहकांना 24 तास सेवा देत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात दोन हजार मेडिकल्स सुरळीतपणे सुरू आहेत. मेडिकल्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र तातडीने देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. तसेच संघटनेच्यावतीने बांधिलकी जपली जात असून सॅनिटायझर्स व मास्कचे पोलिस, महापालिका प्रशासन, एसटी चालक-वाहक, वृद्धाश्रम आदी ठिकाणी मोफत वितरण केले आहे.
- विशाल दुर्गाडे, जिल्हाध्यक्ष, केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना 
 

भाजीपाला मिळेल, पण... 

भाजीपाला जीवनावश्‍यक वस्तू आहे. महापालिका क्षेत्रात दोन हजारहून अधिक विक्रेते आहेत. विक्रेते आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीत शिवाजी मंडई आणि जुनी भाजी मंडई सुरू ठेवली आहे. परंतु तेथे गर्दी होत आहे. विक्रेत्यांनी शक्‍य असेल तर दारोदारी फिरून भाजीपाला विकावा, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावून विक्री करावी, अशा सूचना केल्या आहेत. नागरिक आणि प्रशासनाने सहकार्याची भूमिका घ्यावी.

- शंभोराज काटकर, संस्थापक अध्यक्ष, जनसेवा फळे, भाजीपाला संघटना

loading image