Loksabha 2019 : ...तेव्हा कधी जात निघाली नव्हती - बाबर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

तासगाव - पंढरपूर लोकसभा मतदार संघातून सातवेळा संदिपान थोरात यांनी प्रतिनिधीत्व केले. रामदास आठवले दोनवेळा लढले, मात्र कधीच या उमेदवारांची जात चर्चेत आली नव्हती. यावेळी जातीवर राजकारण करण्याचा प्रकार सुरू आहे. लोक विकासाचं बोलत नाहीत, कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही, अशा शब्दांत आमदार अनिल बाबर यांनी गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला.

तासगाव येथील विद्यानिकेतन पटांगणावर आयोजित भाजपच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आगमनाआधी जिल्ह्यातील नेत्यांनी येथे जोरदार फटकेबाजी केली. 

श्री. बाबर म्हणाले,‘‘मी भाजपच्या व्यासपीठावर येऊन प्रचार करेन, असे मला कधी वाटले नव्हते. परंतु, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या मुद्द्यावर युतीचा निर्णय घेतला. आमच्यासाठी मतदार संघाचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठी भाजप-शिवसेना युतीने पूर्ण बळ दिले. भविष्यात त्या आधारेच राजकारण करू. आम्ही जात सांगून राजकारण करणार नाही.’’

माजी आमदार नितीन शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी  केली. ते म्हणाले,‘‘भाजपने कधीच जातीच्या आधारावर राजकारण केले नाही. ज्याची क्षमता आहे, त्याला संधी दिली. वसंतदादांच्या नावच्या संस्था मोडून खाणारे लोक आता त्यांच्या नावाने जोगवा मागत आहेत. त्यांना भीक घालू नका. भारतीय जनता पक्षाच्‍या उमेदवाराच्‍या पाठीशी ठामपणे उभे रहा.’’

महापौर संगीता खोत यांनी भाजपने आपल्या अनुभवाचा विचार करत महापौर केल्याचा दाखला दिला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी भाजपनेच पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी विरोधक म्हणून लुटारू आहे, वंचित असल्याचे सांगून पन्नास लाखांच्या गाडीतून फिरतात, असा टोला लगावला. एकूणच तासगावच्या पटांगणावर एकीकडे उन्ह आणि दुसरीकडे राजकीय आरोपांनी वातावरण चांगलेच तापले होते. त्यावर श्री. शहा यांनी तोफा डागत रंगत आणली. 

Web Title: Loksabha 2019 Anil Babar comment