Loksabha 2019 : गोपीशेठंना "वर्षा'ची कोणती "ऑफर'? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना "बिग ऑफर' दिली होती असं काल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ती ऑफर कोणती हे मात्र गोपीचंदनाच विचारा असेही त्यांनी सांगून टाकले. त्यामुळे "गोपीशेठ'ना ऑफर होती याबद्दल राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे.

सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना "बिग ऑफर' दिली होती असं काल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ती ऑफर कोणती हे मात्र गोपीचंदनाच विचारा असेही त्यांनी सांगून टाकले. त्यामुळे "गोपीशेठ'ना ऑफर होती याबद्दल राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे. पडळकरांनी मात्र अशा "ऑफर'पेक्षा सामान्यांच्या भावना अधिक महत्वाच्या आहेत असं सांगत महत्वाची आहे', असे सांगून तूर्त या मुद्याला बगल दिली आहे. 

पडळकर यांच्या सांगण्यानुसार, 2014 च्या निवडणूकीत त्यांनीच खासदार संजय पाटील यांना भाजपमध्ये जा आणि लोकसभा लढवा, असा सल्ला दिला होता. संजयकाका लढले आणि जिंकलेही. त्यात गोपीचंद यांनी जोरदार प्रचारही केला होता. जिल्हा परिषद निवडणुकीच्या जागावाटपात आणि काही आर्थिक व्यवहारांत त्यांच्यात वितुष्ट आल्याचे सांगितले जाते. तो वाद इतका टोकाला गेला की दोघांनी एकमेकांची लायकी काढली गेली. एका टप्प्यावर जाऊन पडळकर यांनी भाजपत्याग करीत आणि लोकसभेसाठी रिंगणात उतरण्याची घोषणा केली.

अर्थातच, गोपीचंद यांनी उमेदवारी भाजपसाठी त्रासाची ठरू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पाचारण केले. सविस्तर चर्चा केली. या गोष्टी उघड होत्या, मात्र "वर्षा' बंगल्यावर घडले काय, याचा उलगडा होत नव्हता. लोकसभेच्या उमेदवारी निश्‍चितीच्या टप्प्यात गोपीचंद दोन-चार दिवस चित्रातून बाजूला झाले होते. याच काळात मुख्यमंत्र्यांनी त्यांना "बिग ऑफर' दिल्याचे सांगण्यात आले. 

गोपीचंद यांचे भाग्य उजळले असते, फार नाही फक्त दोन महिने वाट पहावी लागली असती, असे चंद्रकांतदादा म्हणाले. या वाक्‍याचा संदर्भ घ्यायचा तर विधान परिषदेच्या काही जागा रिक्त होत असून त्यावर गोपीचंद यांना संधी दिली जाण्याचा शब्द दिला असावा, असा कयास केला जातोय. सोबतच, महादेव जानकर यांच्यासोबतीने राज्यात आणखी एका धनगर नेत्याला किमान राज्यमंत्रीपदी संधी देऊन समाजाचा रोष कमी करण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झाला असता. यापलिकडे जावून गोपीचंद यांना काय ऑफर असेल, याचाही कयास लावला जातोय. त्यात शेळी-मेंढी विकास महामंडळावर नेमणूकीसह अन्य महामंडळांचा पर्याय असू शकेल, असे सांगितले गेले. आता चंद्रकांतदादांनी तर पूर्ण मूठ उघडलेली नाही. गोपीचंदही तूर्त त्यावर बोलायला तयार नाहीत, मात्र "बिग ऑफर'पेक्षा मला समाजहित महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी चंद्रकांतदादांचे विधान स्वतःच्या पथ्यावर पडेल, याची खबरदारी घेतली आहे.

Web Title: Loksabha 2019 Chief Minsiter Offer to Gopichand Padalakar