Loksabha 2019 : स्वाभिमान सोडलेल्यांच्या आश्रयाला काँग्रेस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

‘‘वसंतदादांच्या जन्मशताब्दीनिमित्त काँग्रेसने किंवा त्यांच्या वारसांनी एकही कार्यक्रम केला नाही. आम्ही सरकारतर्फे शताब्दी साजरी केली. दादांच्या वारसांची सोयीस्कर भूमिका आम्ही ओळखून आहोत.  ते, केवळ दादांचे नाव घेऊन नाटक करीत आहेत. त्यामुळेच शंभर वर्षांच्या काँग्रेसवर चिन्हाविना लढण्याची वेळ आली आहे.’’

जत - शंभर वर्षांच्या काँग्रेसची जिल्ह्यात कुठेही शाखा उरलेली नाही. आता त्यांना स्वाभिमान गहाण टाकलेल्यांच्या आश्रयाला जायची वेळ आली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यावर त्यांनी तीव्र शब्दात टीका केली. विशाल यांना वसंतदादाचे राजकीय वारस म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असा घणाघातही केला. लोकसभेच्या सांगली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या संख (ता. जत) येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार संजय पाटील, पृथ्वीराज देशमुख, आमदार विलासराव जगताप, सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, दिनकर पाटील, सुनील पवार, तमनगौडा पाटील, रवींद्र आरळी, श्रीपाद अष्टेकर, शिवाजीराव ताड, अजित पाटील, संजय कांबळे, आर. के. पाटील, सरदार पाटील, कविता खोत, रेखा बागेळी, मनोज जगताप आदी उपस्थित होते.

ते म्हणाले,‘‘वसंतदादांच्या जन्मशताब्दीनिमित्त काँग्रेसने किंवा त्यांच्या वारसांनी एकही कार्यक्रम केला नाही. आम्ही सरकारतर्फे शताब्दी साजरी केली. दादांच्या वारसांची सोयीस्कर भूमिका आम्ही ओळखून आहोत.  ते, केवळ दादांचे नाव घेऊन नाटक करीत आहेत. त्यामुळेच शंभर वर्षांच्या काँग्रेसवर चिन्हाविना लढण्याची वेळ आली आहे.’’

खासदार शेट्टींवर टीका करताना श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘स्वाभिमानीचे नेते सत्तेशी समझोता करणार नाही, राजकारण नाही असे बढाया मारायचे. ज्यांना शिव्या द्यायचे, डाकू, लुटरे म्हणायचे आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आहेत. हा कसला स्वाभिमान? आम्हीच खरे स्वाभिमानी आहोत. संघर्ष करून सत्ता मिळवली आणि प्रस्थापितांना विस्थापित केले.’’ 
जातीयवादाची विषवल्ली नको

खासदार संजय पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या राजकारणात जातीची विषवल्ली पेरली जात आहे. त्यात मतदारांनी अडकू नये. मी पुण्यवान माणूस आहे. माझा विजय निश्‍चित आहे. दोघांची बेरीज केली तरी त्यांच्यापेक्षा अधिक मते मला मिळतील. पडळकर, नागज फाट्यावर डुप्लीकेट दारू विकायचे. वसंतदादांचे वारस कधी लोकांमध्ये आलेच नाहीत. जिल्ह्यात पाठीमागून वार करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.  काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षाचा सर्वांचा हिशेब चुकता करू.’’

६२ गावांसाठी योजना पूर्ण करू 
खासदार संजय पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मते मिळणार आहेत. विलासराव जगतापाचे काम चांगले आहे, असे असूनही संखमध्ये सभेचा आग्रह का, हे मला येथे आल्यावर समजले, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘दोघेही हुशार आहेत. म्हैसाळच्या विस्तारित योजना  पूर्ण करण्याचा शब्द घेण्यासाठीच मला बोलवलं आहे. काळजी करू नका. या योजनेला तत्त्वतः मान्यता दिली आहे. निवडणूक होताच ६२ गावांसाठी म्हैसाळ योजनेचा विस्तार होईल.’’

Web Title: Loksabha 2019 Devendra Fadnvis comment