Loksabha 2019 : सेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी - मुंडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची फसवेगिरी उघड झाली आहे, तर त्यांच्याशी भांडण करून एकत्र राहणाऱ्या शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. 

गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची फसवेगिरी उघड झाली आहे, तर त्यांच्याशी भांडण करून एकत्र राहणाऱ्या शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. 

येथे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. क्रांतिसिंह नाना व्यासपीठावर ही सभा झाली. माजी आमदार के. पी. पाटील, धैर्यशील देसाई, मधुकर देसाई, पंडितराव केणे, विश्‍वनाथ कुंभार, विश्‍वास देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते.  

श्री. मुंडे म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे व धनंजय महाडिक यांनी संसदेतील खासदार कसा असावा, हे दाखवून दिले आहे. महाभारतातील अर्जुनासारखे धनंजय महाडिक यांचे काम आहे. देशाइतकीच कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेसाठी ही निवडणूक महत्त्वाची असून, या संसदरत्न धनंजय महाडिक यांनाच पुन्हा संधी द्यावी.   

श्री. मुंडे म्हणाले, ‘‘२०१४ ची मोदी लाट या निवडणुकीत दिसत नाही. याउलट निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे वादळ दिसत आहे. निकालानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे तुकडे होतील, तर कमळाबाई दिसणार नाही.’’  

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘गत निवडणुकीत शरद पवार यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवून मला राष्ट्रवादीची उमेदवारी दिली, तसेच कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने मला निवडूनही दिले. पाच वर्षातील माझ्या कामाचा हिशेब घेऊन तुमच्याकडे आलो आहे. याउलट विरोधी उमेदवारांच्या घरात २५ वर्ष सत्ता होती. त्यांना सत्तेचा मोह अजून सुटलेला नाही. ते कर्तृत्व सिद्ध करण्यापेक्षा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मागितल्यासारखे मला खासदार करा म्हणत आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना अडीच वर्षात ते केवळ ४६ दिवस जिल्हा परिषदमध्ये गेले. मी संसदेमध्ये ७३ टक्के हजेरी लावली, तर त्यांना घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेत पाच टक्केही उपस्थिती लावली नाही. वडिलांनी काढून दिलेला महालक्ष्मी दूध संघ बंद पाडला. यावरूनच त्यांचे कर्तृत्व कळते. आता कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगार कपात करून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत,’’ अशी संजय मंडलिक यांच्यावर टीका केली.                                     

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, ‘‘धनंजय महाडिक अभ्यासू व उत्कृष्ट संसदीय कामकाज करणारे उमेदवार असून, जनता त्यांच्याच पाठीशी राहिल. भुदरगड तालुक्‍यातून त्यांना दहा हजार मताधिक्‍य देऊ.’’ गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्‍वनाथ कुंभार, प्रा. जालंदर, एकनाथ जठार, विश्‍वास देशमुख, मुबारक शेख यांची भाषणे झाली.  ‘बिद्री’चे संचालक मधुकर देसाई, पंडितराव केणे, धनाजी देसाई, गोकुळचे संचालक धैर्यशील देसाई, विलास कांबळे, रणजितसिंह पाटील, दिनकरराव कांबळे, धैर्यशील पाटील (कौलवकर), जि. प. सदस्य जीवन पाटील, धोंडिराम वारके, विजय आबिटकर, बाळासाहेब भोपळे, आर. एस. कांबळे, उपसरपंच सचिन देसाई, मोतेश बारदेस्कर, शरद मोरे, पांडुरंग सोरटे, बापूसो आरडे, विकास पाटील, शिवाजी देसाई, जयवंत गोरे, अजित देसाई, संतोष मेंगाणे आदी उपस्थित होते. सुनील कांबळे यांनी आभार मानले.

दोन धनंजय प्रचारासाठी एकत्र 
महाभारताचा इतिहासातील अर्जुन म्हणजे धनंजय महाडिक असून, या धनंजयाच्या प्रचारासाठी दुसरा धनंजय म्हणून मी आलो आहे. खऱ्या अर्जुनाला तुम्ही विजयी करा, तर विरोधक संजय यांनी धृतराष्ट्राची कॉमेट्री सोडून दुसरे काही केलेले नाही. त्यांना तेच करू द्या, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. 

दहा वेळा जन्म घ्यावा लागेल    
नरेंद्र मोंदी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करीत आहेत. त्यांना शरद पवार कळायला दहा वेळा जन्म घ्यावा लागेल, अशी टीका नरेंद्र मोदी यांच्यावर केली, तर अमित शहा यांचा अफझल खान, असा उल्लेख करीत त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला व मुजरा करायला गुजरात येथे गेलेल्या शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच वाघ व सुंदर मुलीची गोष्ट सांगून त्यांच्या भूमिकेची खिल्ली उडविली.

शेतकऱ्यांची फसवणूक
सरसकट कर्जमाफी करतो, शेतीमालावर उत्पादन खर्चाच्या ५० टक्के वाढवून नफ्यासह हमीभाव देतो, असे सांगणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात उत्पादन खर्च  निघेल, असाही दर दिला नाही. पाच वर्षात शेतकऱ्यांना जेवढा त्रास झाला तेवढा कधीही झाला नाही. याच शेतकऱ्याच्या फसविण्याचे काम त्यांनी केले.

Web Title: Loksabha 2019 Dhananjay Munde comment