Election Results : मंडलिकांकडून ‘व्हॉईट वॉश’, माने ‘जायंट किलर’

Election Results : मंडलिकांकडून ‘व्हॉईट वॉश’, माने ‘जायंट किलर’

कोल्हापूर - केवळ पश्‍चिम महाराष्ट्राचेच नव्हे, तर राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि उत्सुकता ताणलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरात शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांनी दोन लाख ७० हजार ५६८ मतांनी, तर हातकणंगलेत शिवसेनेचेच धैर्यशील माने यांनी ९६ हजार १६६ मताधिक्‍यांनी दणदणीत विजय मिळविला.

निवडणुकीत कोल्हापुरातून विद्यमान खासदार धनंजय महाडिक व हातकणंगलेतून खासदार राजू शेट्टी यांचा धुव्वा उडविला. माने हे ‘जायंट किलर’ ठरले. निकालानंतर दोन्हीही उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्‍यांची प्रचंड आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.

या दोन्ही मतदारसंघांसाठी २३ एप्रिलला चुरशीने ७०.७ टक्के मतदान झाले होते. निवडणुकीच्या सुरवातीपासून या दोन्हीही मतदारसंघात चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती, तसे वातावरणही होते. प्रत्यक्षात दोन्ही मतदारसंघांचा निकाल एकतर्फी लागला.

कोल्हापुरात पहिल्या फेरीपासूनच प्रा. मंडलिक आघाडीवर होते. पहिल्या फेरीत त्यांना १९ हजारांची, दुसऱ्या फेरीत ही आघाडी ३१ हजारांवर पोचली. तिसऱ्या फेरीत ही आघाडी ४५ हजारांवर गेली. त्यानंतरच्या प्रत्येक फेरीत १५ ते २० हजारांनी मंडलिक यांचे मताधिक्‍य वाढतच राहिले. सहाव्या फेरीत मंडलिक यांचे मताधिक्‍य एक लाखावर पोचले आणि तिथेच त्यांचा विजय निश्‍चित झाला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने जल्लोषाला सुरवात केली. सातव्या, आठव्या आणि नवव्या फेरीतही दणदणीत आघाडी घेतली.

दहाव्या फेरीअखेर प्रा. मंडलिक यांना चार लाख २५ हजार २३१, तर श्री. महाडिक यांना दोन लाख ६४ हजार ३५० मते मिळाली होती. या फेरीअखेर प्रा. मंडलिक यांचे मताधिक्‍य दोन लाख २९ हजारांचे होते. त्यानंतरच्याही प्रत्येक फेरीत आघाडी कायम ठेवत तब्बल दोन लाख ७१ हजार मतांनी प्रा. मंडलिक विजयी झाले. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा. मंडलिक यांचा श्री. महाडिक यांनी ३३ हजार २५९ मतांनी पराभव केला. त्या निवडणुकीत श्री. महाडिक यांना करवीर, राधानगरी व दक्षिण या तीन मतदारसंघात मताधिक्‍य मिळाले होते; तर प्रा. मंडलिक यांना त्यांच्या होमपिच असलेल्या कागल, चंदगड व कोल्हापूर उत्तरने साथ दिली होती.

तथापि, त्या वेळी प्रा. मंडलिक आपला पराभव रोखू शकले नाहीत. या वेळी मात्र सर्व सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघांत विक्रमी मताधिक्‍य घेऊन प्रा. मंडलिक यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवाचा चांगलाच वचपा काढला. 
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचीही निवडणूक सुरवातीला एकतर्फीच वाटत होती. गेल्या निवडणुकीत तब्बल पावणेदोन लाख मतांनी विजय मिळविलेले खासदार राजू शेट्टी यांचे या वेळी मताधिक्‍य कमी होईल, पण तेच निवडून येतील, अशी शक्‍यता होती. तथापि, राजकीय विश्‍लेषकांचे हे अंदाज फोल ठरवत नवख्या धैर्यशील माने यांनी त्यांचा तब्बल एक लाखाहून अधिक मतांनी पराभव करून २००९ च्या निवडणुकीत आपल्या मातोश्री श्रीमती निवेदिता माने यांच्या पराभवाचा बदला घेताना श्री. शेट्टी यांची खासदारकीची हॅट्ट्रिक रोखली. 

केवळ पहिल्या फेरीतच श्री. शेट्टी हे १०० मतांनी आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीत श्री. माने यांनी सुमारे तीन हजार मतांची आघाडी घेतली. त्यानंतरच्या प्रत्येक फेरीत श्री. माने यांची आघाडी कायम राहिली. चौथ्या फेरीत श्री. शेट्टी हे चार मतांनी मागे गेले. त्यानंतरच्या प्रत्येक फेरीत श्री. माने यांचीच आघाडी कायम राहिली. 

मतदारसंघनिहाय मंडलिकांचे मताधिक्‍य 
चंदगड - ५०,९१९, राधानगरी- ३९,९३७, कागल- ७१,०९१, कोल्हापूर दक्षिण- ४३,५५९, करवीर- ३६,८३३, उत्तर- २७,७८३.

अंतिम मते अशी 
कोल्हापूर मतदारसंघ 
प्रा. संजय मंडलिक - ७,४५,६७५
धनंजय महाडिक - ४,७६ ८२०
अरुणा माळी - ६३,२५१
नोटा- ८,६९१

पहिल्या फेरीपासूच मंडलिकांची आघाडी
मतमोजणीला आठला सुरवात झाली. साधारण पावणेनऊच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल बाहेर आला. त्यात प्रा. मंडलिक हे सुमारे १९ हजार मतांनी आघाडीवर होती. हीच आघाडी त्यांनी प्रत्येक फेरीत कायम ठेवत मोठा विजय मिळवला. एकाही फेरीत त्यांचे मताधिक्‍य जराही कमी झाले नाही. 

२००४ ची पुनरावृत्ती पण...
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे (कै.) सदाशिवराव मंडलिक व श्रीमती निवेदिता माने हे ‘राष्ट्रवादी’च्या चिन्हावर खासदार झाले होते. आज या दोघांचीही मुले खासदार झाली; पण ती शिवसेनेच्या तिकिटावर. (कै.) मंडलिक यांचे पुत्र प्रा. संजय यांनी कोल्हापुरातून, तर श्रीमती माने यांचे पुत्र धैर्यशील यांनी हातकणंगलेतून सेनेचा भगवा फडकवला. दोघांचेही वारसदार संसदेत पोचले, पण त्यांचा पक्ष मात्र बदलला. 

‘नॉट रिचेबल’ मुद्दा गौण
या निवडणुकीत प्रा. मंडलिक ‘नॉट रिचेबल’ राहतात, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे याचा परिणाम होईल, अशी शक्‍यता होती. परंतु, मतदारांनी ‘नॉट रिचेबल’ हा मुद्दाच खोडून काढत मंडलिकांवर मतांचा पाऊसच पाडला आहे.

अंतिम मते अशी 
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ 
धैर्यशील माने- ५,८५,७७६
राजू शेट्टी- ४,८९,७३७
अस्लम सय्यद- १,२३,४१९
नोटा- ७१०८

माझा विजय जरूर आनंदाचा क्षण आहे; पण पैशांच्या जोरावर काहीही करू शकतो, या महाडिक परिवाराच्या उद्दामपणाचा पराभव मी करू शकलो, हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या निवडणुकीत मनी आणि मसल पॉवरचा धनंजय महाडिक यांनी वापर केला; मतदारांनी मला कोणत्याही प्रलोभनाशिवाय मते देऊन एक नवा इतिहास घडविला. 
- प्रा. संजय मंडलिक

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने दिलेला कौल मी स्वीकारत असून, निवडणुकीचा निकाल अनपेक्षित असला तरी मला मान्य आहे. पाच वर्षांत खासदार म्हणून कोल्हापूरच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. अनेक विकासकामे पूर्णत्वास आणली, तर काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. येत्या वर्षभरात अनेक कामे प्रत्यक्षात उभारतील, अशी आशा आहे. माझ्यावर विश्‍वास ठेवून, ज्या मतदारांनी मला मतदान केले. माझ्यासाठी प्रचार यंत्रणा राबवली, त्या सर्वांचे आभार मानतो. 
- धनंजय महाडिक

आपल्याला कोणी पराभूत करू शकत नाही. अगदी नरेंद्र मोदी विरोधात उभे राहिले तरी त्यांचा टिकाव लागणार नाही, अशी वल्गना राजू शेट्टी करत होते. मीच ठरवले शेट्टींच्या विरोधात आपण उभे राहायचे व त्यांना पराभूत करून दाखवायचे. शेतकऱ्यांची न्याय बाजू शासनात मांडून मी त्यांना नक्की न्याय मिळवून देणार आहे.
- धैर्यशील माने

महाराष्ट्रावर फुले, शाहू, आंबेडकरांचे संस्कार आहेत. हे संस्कार विसरून चालणार नाहीत. जाती आणि धर्मात तेढ निर्माण करून मताची पोळी भाजता येत नाही. पराभूत झालो म्हणून निराश होण्याचे कारण नाही. विचारासाठी दाभोलकर आणि  पानसरे यांनी प्राण गमावले आहेत. माझ्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती आहे, की मी २५ वर्षे जे संस्कार केले आहेत, ते तकलादू नव्हते, हे लक्षात घ्यावे. पराभवाच्या कारणांचे शांत डोक्‍याने आत्मचिंतन करणार आहे. नव्या उमेदीने गोरगरीब, शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत. 
- राजू शेट्टी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com