Loksabha Results : सांगलीत संजयकाकाच हिरो 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

एक नजर

  • सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांची बाजी.
  • 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे मताधिक्‍य. 
  • यंदा तिरंगी लढतीत संजयकाका पाटील यांच्या मताधिक्‍यात घट. 
  • चौदाव्या फेरी अखेर सुमारे 1 लाख 43 हजार इतके मताधिक्‍य घेत विजयाकडे कुच
  • विशाल पाटील यांना 3 लाख 9 हजार तर गोपीचंद पडळकर यांना 2 लाख 58 हजार मते. 

सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांनी आज बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे मताधिक्‍य मिळवत त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्विवाद यश मिळवले होते. तिरंगी लढतीत त्यांच्या मताधिक्‍यात घट झाली तरी चौदाव्या फेरी अखेर सुमारे 1 लाख 43 हजार इतके मताधिक्‍य घेत विजयाकडे कुच केली आहे. विशाल पाटील यांना 3 लाख 9 हजार तर गोपीचंद पडळकर यांना 2 लाख 58 हजार मते मिळाली आहेत. 

दरम्यान आज सकाळी सव्वाआठला टपाली मतदान मोजण्यास प्रारंभ झाला. मतमोजणी केंद्र असलेल्या मिरज रस्त्यावरील शासकीय गोदामाकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मिरज रस्त्यावरच रोखून धरले होते. निकालाचे कल दुपारनंतरच स्पष्ट होणार असे आधीपासून प्रशासनाने जाहीर केले होते. त्यामुळे सकाळी फारशी गर्दीही झाली नाही. तांत्रिक कारणामुळे मतमोजणीचे प्रारंभीचे कल समजायलाही उशीर झाला. साधारण साडेदहापासून कल येण्यास सुरवात झाली. सुरवातीच्या फेरीत तीनही उमेदवार एकमेकाला घासून वाटचाल करीत होते. मात्र त्यातही संजय पाटील यांची आघाडी कायम होती. हीच आघाडी कायम ठेवत संजय पाटील यांनी विजय साकारला. 

राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या संजय पाटील यांनी गेल्या लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजय मिळवला होता. त्यानंतर पाच वर्षे भाजपच्या सत्तेचा वारु जिल्ह्यात चौफेर उधळला होता. या सर्व वाटचालीत त्यांनी संपुर्ण मतदारसंघात अखंड संपर्क ठेवत आपला पाया विस्तारला होता.

काँग्रेसच्या हतबल निष्क्रिय नेतृत्वामुळे त्यांनी पुर्ण मतदारसंघात पुर्वाश्रमीचे काँग्रेस - राष्ट्रवादीतील सहकारी हाताळले. दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देत त्यांनी भाजपचा पाया विस्तारला. त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत उमेदवारीला फारसे आव्हान उभे राहिले नाही. त्यांना उमेदवारीही सहजपणे मिळाली. त्यानंतर सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात त्यांना मिळालेली मते भाजपची मुळे रुजत असल्याचे स्पष्ट करणारी आहेत.

दुष्काळी पूर्व भागात सिंचन योजनांची कामे मार्गी लावण्यात आलेले यश, राष्ट्रीय महामार्गाची सुरु झालेली कामे यातून जिल्ह्यात विकासाचे अश्‍वासक चित्र उभे करण्यातही भाजपला यश आले होते. तुलनेने भाजपच्या या विकासाच्या दाव्यांना खोडून काढण्यापेक्षा विरोधी दोन्ही उमेदवारांचा प्रचाराचे संपुर्ण सूत्र संजय पाटील यांच्या व्यक्तीगत गुंडगिरीच्या प्रतिमेला लक्ष करणारे होते. त्याला फारसा प्रतिसाद मतदारांमधून मिळाला नाही.

खासदार पाटील यांचे मताधिक्‍य घटणार ते घासून येणार अशा शंका व्यक्त झाल्या तरी प्रत्यक्ष कागदावरील चित्र मात्र तसे काही सांगत नव्हते. तेच निकालातून दिसून आले. 

2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला प्रथमच ढासळला. वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील पराभवानंतर मतदारसंघातूनच अदृष्य झाले. त्यानंतर काँग्रेस - राष्ट्रवादीने जिल्हापरिषद, महापालिका, पंचायत समित्या, नगरपरिषदा अशी सत्ताकेंद्रे एकापाठोपाठ एक गमावली. अगदी अलीकडे झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादीने आघाडी करुनही भाजपने विजय मिळवला.

भाजपच्या या घौडदौडीचा पुरेसा अंदाजही काँग्रेसच्या नेत्यांना आला नाही. गेल्या पाच वर्षात आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि मदन पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे दोन्ही काँग्रेस अक्षरक्षः निराधार झाल्या होत्या. अगदी दोन महिन्यापर्यत काँग्रेसमध्ये लढायलाच कोणी नव्हते अशी स्थिती होती. कदम - पाटील घराण्याच्या बाहेरच्या उमेदवाराचा विचारही काँग्रेस करू शकत नव्हती. शेवटी प्रदेश नेतृत्वाने आघाडीच्या जागा वाटपात ही जागा स्वाभीमानीच्या गळ्यात मारली. त्यानंतर केवळ अस्तित्वासाठी विशाल पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याकडून ही जागा हक्काने मागून घेत निवडणूक लढवली.

ऐनवेळी लोकसभेच्या रिंगणात उडी घेत निवडणुकीत रंग भरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र खरा रंग भरला तो गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीनंतरच. ते सुरवातीस काँग्रेस - स्वाभीमानीकडून त्यांची उमेदवारी निश्चित होणार होती मात्र ती ऐनवेळी नाकारल्यानंतर त्यांनी वंचित विकास आघाडीकडून उमेदवारी घेत शड्डू ठोकला. आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी घेतलेल्या सांगलीतील सभेत मिळालेला प्रतिसाद आणि दुष्काळी पट्टयातून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ते चांगली मते घेणार हे प्रारंभीच स्पष्ट झाले होते. ही लढत तिरंगी करण्यात त्यांनी यश मिळवले मात्र त्यांना असलेल्या मर्यादाही स्पष्ट झाल्या.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Election Result Sangli constituency