आमदार डॉ. मिणचेकरांची रणनीती मानेंसाठी किफायतशीर

आमदार डॉ. मिणचेकरांची रणनीती मानेंसाठी किफायतशीर

 नवख्या धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत राजू शेट्टी यांचा पराभव केला. या विजयाने अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या माने गटाला नव्याने उभारी मिळाली आहे. पराभवाने शेट्टींवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.

वंचित आघाडीचाही त्यांना निश्‍चितच फटका बसल्याचे स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांना वंचित आघाडीचा विचार करावा लागणार आहे. जातीपातीच्या राजकारणानेही जोर खाल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालाचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर निश्‍चितच होणार असून, शिवसेना-भाजपच्यादृष्टीने ही जमेची बाजू ठरणार आहे.

मिणचेकरांची रणनीती 
आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी सुरुवातीपासूनच व्यूहरचना करत आखलेली रणनीती मानेंसाठी किफायतशीर ठरली. याचा फायदा आमदार मिणचेकर यांना निश्‍चितच येत्या विधानसभेत होणार आहे. 

गेल्या दहा वर्षांत राजू शेट्टी यांनी केवळ ऊसदर व दूध दराच्या आंदोलनापलीकडे काहीच ठोस काम केले नाही. अशातच त्यांची दलबदलू भूमिका त्यांच्या अंगलट आली. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत स्वतंत्र निवडणूक लढवली. २०१४ मध्ये भाजप आघाडीकडून निवडणूक लढवत मोदी लाटेवर स्वार होत ते विजयीही झाले. त्यानंतर त्यांनी भाजप नेतृत्वावरच आगपाखड करत परत ते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वळचणीला गेले. त्यामुळे त्यांच्यावरील नाराजी वाढतच गेली. काँग्रेसच्या आवाडे, आवळे गटाबरोबरच राष्ट्रवादीच्या राजेंद्र पाटील-यड्रावकरांनीही शेट्टी यांच्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र ते त्यांना विजयांपर्यंत नेऊ शकले नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँगेस राष्ट्रवादीला विजयासाठी झगडावे लागणार आहे हे निश्‍चित.

काही वर्षांपासून माने गटाची अस्तित्वासाठी धडपड सुरू होती. नाराज होऊन बाजूला गेलेले कार्यकर्ते विखुरले होते. अशातच त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेने त्यांची उमेदवारी जाहीर केली. सुरुवातीला राजू शेट्टींसाठी ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. मात्र दिवसेंदिवस चित्र बदलत गेले. मोदी लाटेबरोबरच युवा वर्ग भगव्याशी जोडत गेला. धैर्यशील मानेंनीही मला मत म्हणजे मोदी यांना मत, अशी भावनिक हाक दिली आणि त्यात ते यशस्वी झाले. गेल्या निवडणुकीत शेट्टींना हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून तब्बल ४८ हजारांचे मताधिक्‍य होते, शिवसेना भाजप त्यावेळी त्यांच्यासोबत होती. त्याच शिवसेना-भाजपने या निवडणुकीत त्यांना पराभूत केले. 

वंचितची मते निर्णायक
निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यांत वंचित बहुजन विकास आघाडीने एंट्री केली. वंचितला मानणारा मुस्लिम व बौद्ध समाज हे शेट्टींचे हक्काचे मतदान; पण याच मतांचा फटका शेट्टींना बसला. वंचितच्या सय्यद यांनी घेतलेली लाखांवर मते हीच शेट्टीच्या पराभवात निर्णायक ठरली, त्यामुळे भविष्यातील राजकारणात वंचित आघाडीचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. शिवाय जनसुराज्यचे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे व माजी आमदार राजू आवळे यांची अस्पष्ट भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांना संभ्रमावस्थेत टाकणारी ठरली.

नकारात्मक भूमिका मानेंच्या पथ्यावर
ठराविक आंदोलनापलीकडे शेट्टी यांनी गेल्या दहा वर्षांत कोणतेही भरीव काम केले नाही. त्यांचे अनेक कट्टर कार्यकर्ते त्यांना सोडून गेले. कार्यकर्त्यांचीही फळी विस्कळीत झाली. अशातच त्यांची प्रत्येक निवडणुकीतील दलबदलू भूमिकेने त्यांनी रोष ओढून घेतला. त्यांच्याविषयीची नकारात्मक भूमिकाच धैर्यशील मानेंच्या पथ्यावर पडली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com