Election Results : इचलकरंजीतील प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा शेट्टींना फटका

Election Results : इचलकरंजीतील प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा शेट्टींना फटका

वारणा पाणी योजनेबाबत घेतलेली उदासीन भूमिका आणि अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगाबाबत केलेल्या दुर्लक्षाचा फटका राजू शेट्टी यांना बसल्याचे निकालातून पुढे आले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना युवा वर्गाची पसंती, मोदी फॅक्‍टर व भाजपची प्रभावी प्रचार यंत्रणा याचा मोठा लाभ झाल्याचे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून दिसून आले. या निकालातून आमदार सुरेश हाळवणकर यांचा इचलकरंजी मतदारसंघावर प्रभाव असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर धैर्यशील माने यांच्या विजयात इचलकरंजीकरांचा सर्वाधिक मोठा हिस्सा राहिला.

सुरुवातीपासूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविरोधात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात नाराजीचा सूर होता. इचलकरंजीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वारणा पाणी योजनेचा विषय हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला होता. शहरवासीयांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्‍नावर खासदार शेट्टी यांनी उदासीन भूमिका घेतली होती. हाच मुद्दा धैर्यशील माने यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला होता. सुरुवातीपासूनच या मतदारसंघात राजू शेट्टी यांना कमी मताधिक्‍य मिळणार हे जवळपास निश्‍चित होते. त्यानुसार निकालात ही बाब स्पष्ट झाली आहे.

मुळात राजू शेट्टी यांचा अत्यंत कमी संपर्क राहिला. येथे सध्या वस्त्रोद्योग अडचणीत आहे. अशावेळी खासदार शेट्टी यांच्याकडून शासन पातळीवर विशेष प्रयत्न झाले नाहीत. त्याचा फटकाही त्यांना या निवडणुकीत बसला. दोन टर्म खासदार असतानाही त्यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपल्या पक्षाची बांधणी केली नाही. परिणामी त्यांना या निवडणुकीत पूर्णपणे काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य मित्र पक्षांच्या यंत्रणेवर अवलंबून रहावे लागले. त्यामुळे या मतदारसंघात अपेक्षित प्रभावी प्रचार झाला नाही. तुलनेने शिवसेना-भाजपची प्रचार यंत्रणा पूर्ण ताकदीने राबविण्यात आली. त्याचा फायदा धैर्यशील माने यांना झाल्याचे दिसत आहे. या निवडणूक निकालामुळे शिवेसना-भाजप आघाडीला अधिकच बळ मिळाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का आहे. इचलकरंजी विधान सभा क्षेत्रात इचलकरंजीसह सहा गावांचा समावेश आहे.

या क्षेत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद नगण्य आहे. गत निवडणुकीत राजू शेट्टी यांना मोदी लाटेचा फायदा झाला होता. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून त्यांना १८ हजारहून अधिक मताधिक्‍य मिळाले होते. या वेळी मात्र सुरुवातीपासूनच राजू शेट्टी यांच्या विरोधात या मतदारसंघात वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या विरोधातील वातावरण कमी करण्यात त्यांना शेवटपर्यंत यश आले नाही. किंबहुना या मतदारसंघात मताधिक्‍य मिळणार नाही, अशा मानसिकतेतूनच प्रचार करण्यात आला होता.

पारंपरिक माने गट विरोधात, तरीही..

या निवडणुकीत एकेकाळी माने गटाचे कट्टर समर्थक असलेले माजी आमदार अशोकराव जांभळे, मदन कारंडे, जयवंतराव लायकर, संभाजीराव नाईक यांनी खासदार राजू शेट्टी यांचा प्रचार केला. त्यानंतरही इचलकरंजीतून धैर्यशील माने यांच्यावर मतांचा पाऊस पडला.

शिवसेनेला मिळणार ताकद
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची नगण्य ताकद आहे. मात्र, धैर्यशील माने यांच्या विजयामुळे शहर व परिसरातील शिवसेनेला चांगली उभारी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

वारणा योजनेचे आव्हान
रखडलेली वारणा पाणी योजनेचा मुद्दा प्रचारात गाजला. त्याचा मोठा फटका राजू शेट्टी यांना बसला. आता ही योजना समन्वयाने मार्गी लावण्याची महत्त्वाची जबाबदारी धैर्यशील मानेंवर आली आहे.

राज ठाकरेंचा फ्लॉप शो
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वात मोठे इचलकरंजी शहर आहे. राजू शेट्टी यांची नाराजी दूर करण्यासाठी या ठिकाणी मनसेचे राज ठाकरे यांची सभा घेण्यात आली. सभेला गर्दी झाली. पण त्याचा मतदानांवर परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचा फ्लॉप शो झाला आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com