Election Results : जोतिबाचा आणि विजयाचा गुलाल एकाच वेळी...! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

कोल्हापूर - इकडे मतमोजणीला सुरवात झाली होती आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मात्र जोतिबा डोंगराची वाट पकडली होती. त्यांच्यासोबत अमर पाटोळे, शशिकांत खोत होते. ते जोतिबावर पोचले आणि प्रसादाचे साहित्य घेत असतानाच एका कार्यकर्त्याचा त्यांना फोन आला. त्याने पंधरा हजार लीडची चांगली बातमी दिली. 

कोल्हापूर - इकडे मतमोजणीला सुरवात झाली होती आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मात्र जोतिबा डोंगराची वाट पकडली होती. त्यांच्यासोबत अमर पाटोळे, शशिकांत खोत होते. ते जोतिबावर पोचले आणि प्रसादाचे साहित्य घेत असतानाच एका कार्यकर्त्याचा त्यांना फोन आला. त्याने पंधरा हजार लीडची चांगली बातमी दिली. 

ते मंदिरात पोचले. तोवर जोतिबा मंदिरातील गुरव मंडळींची त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यास गडबड सुरू झाली. जोतिबाचा व विजयाचा असे दोन्ही गुलाल त्यांच्या कपाळावर लागले.

"जोतिबाच्या नावानं चांगभलं'चा गजर सुरू झाला. मंदिरातून ते परत गाडीकडे येत असताना लोक त्यांचे अभिनंदन करू लागले. जोतिबावर काही भागात मोबाईल रेंजची अडचण होती, त्यामुळे केर्लीत हनुमानाच्या मंदिराजवळ त्यांनी गाडी थांबवून फोन घेतले. ते कोल्हापुरात आल्यानंतरही थेट घरी न जाता आझाद चौकातील दत्त व एकवीरा मंदिरात गेले.

दरम्यान, श्री. मंडलिक दत्त मंदिरात आल्याचे कळताच 30 ते 40 मोटारसायकलस्वार तेथे घोषणा देत आले. त्यांच्या पाठोपाठच ते रुईकर कॉलनीतल्या घरी आले. तोवर मताधिक्‍याचा अंदाज आल्याने घरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती. मात्र, मतमोजणीची दहावी, बारावी फेरी झाल्यानंतरच गुलालाची उधळण करायची, अशा सक्त सूचना संजय मंडलिक यांनी दिल्या होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांना संयम धरूनच थांबावे लागत होते. तरीही अधूनमधून "वाघ आला रे वाघ आला, शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. 

घरातला टीव्ही मात्र बंद
 सारा देश आज टीव्हीसमोर बसून निवडणूक निकालाच्या घडामोडी पाहत होता; पण संजय मंडलिक यांच्या घरातला टीव्ही मात्र बंद ठेवण्यात आला होता. मतमोजणीच्या दहा ते बारा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर टीव्ही सुरू करायचा, असे मंडलिक परिवाराने जणू ठरवलेच होते. तसेच संजय मंडलिक, त्यांचे वडील माजी खासदार (कै.) सदाशिवराव मंडलिक यांच्या खोलीत निवडक कार्यकर्त्यांसह बसून होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Election Results Kolhapur constituency