Loksabha 2019 : खासदार शेट्टी-आवाडेंची खलबते

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जोडणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे व खासदार राजू शेट्टी यांच्यात काँग्रेस कमिटीत खलबते झाली. बैठकीत शाहूवाडीतील माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचा गट श्री. शेट्टी यांच्या मागे राहील, असा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जोडणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे व खासदार राजू शेट्टी यांच्यात काँग्रेस कमिटीत खलबते झाली. बैठकीत शाहूवाडीतील माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचा गट श्री. शेट्टी यांच्या मागे राहील, असा निर्णय घेण्यात आला.

प्रचाराच्या धामधुमीतून श्री. आवाडे-शेट्टी दुपारी साडेचारच्या सुमारास काँग्रेस कमिटीत आले. यावेळी माजी आमदार गायकवाड यांच्यासह त्यांचे पुत्र कर्णसिंह, माजी जिल्हा परिषद सदस्य योगीराज गायकवाड, पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष इनामदार, माजी सभापती पंडितराव नलवडे, महादेवराव पाटील, माजी उपसभापती विष्णू पाटील, दामाजी पाटील-पैलवान, सखाराम गाडे-पेरीड, एस. के. माळी आदी उपस्थित होते. 

२०१४ च्या निवडणुकीत शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून श्री. शेट्टी यांना ४२ हजारांचे मताधिक्‍य मिळाले आहे. लोकसभा मतदारसंघातील इतर विधानसभा मतदारसंघांतील प्रतिसाद पाहता शाहूवाडीचे मताधिक्‍य कमी होऊ नये, यासाठी श्री. शेट्टी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी श्रीमती गायकवाड यांच्यासह त्यांच्या मुलांशी काँग्रेस कमिटीत श्री. आवाडे यांच्या समक्ष चर्चा केली.

श्री. शेट्टी आघाडीतील घटक पक्षाचे उमेदवार असल्याने शाहूवाडीतील काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीवर राहू, अशी ग्वाही या बैठकीत दिली. याच बैठकीत पक्ष नेतृत्वाकडून आमच्याकडे दुर्लक्ष झाले आहे, अशी नाराजी गायकवाड गटाने यावेळी व्यक्त केली. तथापि, यापुढे असे होणार नसल्याची ग्वाही श्री. आवाडे यांनी दिली.

पाडव्यानंतर संयुक्त मेळावा
काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गुढीपाडव्यानंतर घेण्याचे बैठकीत ठरले. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण शाहूवाडीतच आहोत, त्यादिवशी या मेळाव्याची तारीख निश्‍चित करू, असे श्री. शेट्टी यांनी कर्णसिंह गायकवाड यांना सांगितले.

Web Title: Loksabha 2019 Hatkanangale Lok Sabha Constituency