Loksabha 2019 : 'सहकार' उद्‌ध्वस्त करण्याचा भाजप सरकारचा डाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

कुडित्रे - ‘विना सहकार नही उद्धार’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था स्थापन केल्या. त्यांतून ग्रामीण भागाचा विकास झाला; पण या देशात आणि राज्यातील भाजप सरकारने सत्तेच्या जोरावर सहकारी संस्था मोडण्याचा डाव आखला आहे, अशी टीका माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केली.

कुडित्रे - ‘विना सहकार नही उद्धार’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था स्थापन केल्या. त्यांतून ग्रामीण भागाचा विकास झाला; पण या देशात आणि राज्यातील भाजप सरकारने सत्तेच्या जोरावर सहकारी संस्था मोडण्याचा डाव आखला आहे, अशी टीका माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केली.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ कुडित्रे (ता. करवीर) येथे आयोजित प्रचार सभेत श्री. पाटील बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संभाजी पाटील होते.

ते म्हणाले, ‘‘सहकारी संस्थांत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना घुसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अन्यथा सत्तेचा दुरुपयोग करून प्रत्येक संस्थेवर शासनाचा प्रतिनिधी घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. त्यातून सहकार उद्‌ध्वस्त करण्याचे षड्‌यंत्र आखले जात आहे.’’

श्री. पाटील म्हणाले, ‘‘काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. येत्या निवडणुकीत खासदार महाडिक यांना निवडून देण्यासाठी दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. ६० वर्षांत भाजपने स्वतः कोणतीही संस्था स्थापन केली नाही. शेतकरी व कष्टकरी डोळ्यापुढे असलेल्या काँग्रेसने आजवर सहकारी क्षेत्राला चालना दिली. अनेक सहकारी संस्था स्थापन करून ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मजबूत केला; पण भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा डाव आखला. नोटबंदीमुळे सहकारी बॅंका डबघाईला आल्या. साखर आयात करून कारखाने मोडण्याचा डाव आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण देशात आता भाजपविरोधी लाट असून काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवर आणा.’’

‘कुंभी’चे माजी अध्यक्ष संभाजी पाटील म्हणाले, ‘‘शिवसेना-भाजप निवडणुकीपूर्वी एकमेकांवर आरोप करत होते. आता केवळ सत्तेसाठी गळ्यात गळे घालून एकत्र लढत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही. अशा परिस्थितीत सहकार क्षेत्र आणि शेतकरी वाचवायचा असेल तर श्री. महाडिक यांना विजयी करणे काळाची गरज आहे.’’

बाजार समितीचे माजी सभापती पै. संभाजी पाटील, यशवंत बॅंकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, संचालक आनंदराव पाटील, सरपंच विजय यांनी भाषण केले. मेळाव्याला करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, बाळ पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत के. एम. किरूळकर यांनी केले, तर आभार विश्‍वास शेलार यांनी मानले.

Web Title: Loksabha 2019 P N Patil comment