Loksabha 2019 :  साध्वीला तिकिट देणे हे लोकशाहीवरचा विश्‍वास उडाल्यासारखे - आंबेडकर

Loksabha 2019 :  साध्वीला तिकिट देणे हे लोकशाहीवरचा विश्‍वास उडाल्यासारखे - आंबेडकर

सांगली - ‘‘पंतप्रधान मोदी एकीकडे आंतकवाद संपवला असे म्हणतात, तर दुसरीकडे बॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी देतात. भोपाळमध्ये अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना डावलून साध्वी ठाकूरला उमेदवारी देऊन तुम्ही नेमका संदेश काय देताय, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला व साध्वीला तिकिट देणे म्हणजे लोकशाहीवरचा विश्‍वास उडाल्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.  

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ आज डॉ. आंबेडकर स्टेडियमवर आयोजित सभेत ते बोलत होते.श्री. आंबेडकर म्हणाले, ‘‘ केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज म्हणतात हवाई हल्ल्यात कोणाला मारले नाही. मात्र मोदी म्हणतात तीनशे मारले, अमित शाह म्हणतात दोनशे मारले. स्वराज यांनी खरे बोलून नामुष्कीतून वाचवले आहे. बीबीसी, आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था यांनी पुरावे मागितले तर दिले नाहीत. त्यामुळे ते खोटारडे आहेत. त्यांना सत्तेवर पुन्हा बसवणे म्हणजे शहीदांचा अपमान आहे. साध्वीकडून शहीदांचा अपमान होऊनही मोदी, शहा बोलत नाहीत. त्यामुळे असले नालायक सरकार पुन्हा सत्तेवर बसता कामा नये.’’

श्री. आंबेडकर म्हणाले, घाबरू नका, मोदी आता पंतप्रधान होणार नाहीत, याची दक्षता आम्ही घेतली आहे. आरएसएस ही टेरेरिस्ट ऑर्गनायझेशन आहे. देशात सुरक्षा यंत्रणा दावणीला असताना आरएसएसकडे एके ४७, टॉमीगन, मल्टीपर्पज गन कशासाठी हवी आहे. आर्मीतील जवान युद्धाच्या वेळेसच वापरतो अशी हत्यारे आरएसएस कडे आहेत. लोकशाही धोकादायक वळणावर आहे. तिला खिळखिळी करून संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’’

मोदींना पंतप्रधान होऊ द्या आम्ही काश्‍मीर प्रश्‍न सोडवतो, असे म्हणणारा पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान आणि मोदी यांच्या गाठीभेटी आमची सत्ता आल्यावर बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही श्री. आंबेडकर यांनी येथे दिला.

माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयसिंग शेंडगे, नांदेडचे यशपाल भिंगे, एमआयएमचे शकील पिरजादे, ब्रह्मदेव पडळकर, प्रा. सुकुमार कांबळे, नाना वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. आंबेडकर म्हणाले, ‘‘पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणतो मोदी पंतप्रधान झाले तर काश्‍मिर प्रश्‍न सुटेल. त्यावर मोदी, शहा काही बोलत नाहीत. सर्वात मोठे देशभक्त मोहन भागवतही काही बोलत नाहीत. पाकिस्तानच्या कारवायामुळे देशातील जवान शहीद होत आहेत. मात्र मोदी का असे म्हणत नाहीत, मी पंतप्रधान व्हायचे असेल तर हे शहीद करणे थांबव. सीमेवरील हल्ले थांबव असे का म्हणत नाहीत. मोदींचे सरकार हे डाकूंचे आहे. भारतीय नोटेवर वचन छापले असताना मोदींना त्या रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला. त्यांनी काळ्या पैशावर डल्ला मारला. उद्या पांढऱ्या पैशावर डल्ला मारतील. अजूनही जुन्या नोटा पडून आहेत, तुम्ही गोपीचंदला निवडून द्या, त्या बदलून देण्याची तुम्हाला संधी देतो.’’

स्टेडियम गर्दीने फुलले-
डॉ. आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमवर आंबेडकरांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सभा ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यामुळे स्टेडियम गर्दीने व्यापले गेले होते. लाखाची गर्दी झाल्यामुळे मोबाईल नेटवर्क बंद केल्याची माहिती एका निवेदकाने सभास्थळी दिली.

डिपॉझिट जप्त होणार
गोपीचंद पडळकर यांनी घणाघाती भाषण केले. संजयकाका आणि विशाल पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. दोघांनीही कारखाने भंगारात विकण्याचा धंदा केला आहे. दोघांचेही या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणार आहे. दोघेही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. ही निवडणूक आता एकतर्फी झाली आहे. दोन लाखांच्या फरकाने मी विजयी होईन, असा विश्‍वास व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com