Loksabha 2019 : चंद्रकांतदादा, जास्त अंगावर आलात, तर अंगलट येईल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

कोल्हापूर - ‘चंद्रकांतदादा, जास्त अंगावर आलात, तर अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. बिंदू चौकात एकदा कुस्ती होऊनच जाऊ द्या,’ असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी आज पुन्हा एकदा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.

कोल्हापूर - ‘चंद्रकांतदादा, जास्त अंगावर आलात, तर अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. बिंदू चौकात एकदा कुस्ती होऊनच जाऊ द्या,’ असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी आज पुन्हा एकदा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. कृषी विभागापासून ते कार्यकारी अभियंत्यापर्यंत सर्वच गोष्टींचा एकदा पंचनामा होऊ द्या, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, तसेच मित्रपक्षांच्या झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. 

शेट्टी म्हणाले, ‘‘चंद्रकांतदादांनी नेमके किती पैसे आणले? ज्या ‘हेड’खाली पैसे आणले, त्या ‘हेड’चे नाव तरी सांगावे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील रस्ते खासगीकरणातून झाले. एखादी कंपनी बोलवायची, मांडवली करायची, यापलीकडे काही झाले नाही. टोलचे आणि कोल्हापूरचे वेगळे नाते आहे.

खासगीकरणातून झालेल्या रस्त्यांवर आम्ही का टोल भरायचा? सत्तांत्तर झाले, तरी टोलविरोधी आंदोलन करावे लागेल. कॉर्पोरेट कंपनीला पायघड्या घालायच्या, मांडवली करायची हे काही ध्यानात येत नाही का? कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी २० कोटी रुपये खर्च केले म्हणता? हे नेमके पैसे खर्च झाले कुठे? पंचनामा करायचा म्हटला, तर तो अनेक गोष्टींचा करावा लागेल. 

कृषी अधिकाऱ्यापासून कार्यकारी अभियंत्यांपर्यंत तो करावा लागेल. बिंदू चौकात एकदा कुस्ती होऊनच जाऊ द्या. जास्त अंगावर आलात, तर अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार यांच्यावर व्यक्तिद्वेषातून टीका केली नसल्याचे सांगून शेट्टी यांनी भूमि अधिग्रहण कायदा संसदेत आला, त्या वेळपासून आपण मोदी सरकारला विरोध करण्यास सुरवात केली. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जो कायदा झाला, तो मोडीत काढून उद्योगपतींच्या घशात जमिनी घालण्याचा प्रयत्न झाला. सीमा सुरक्षा दल, तसेच केंद्रीय राखीव दलात शेतकऱ्यांची मुले असतात. त्यांनाही शहिदाचा दर्जा द्या, ही मागणीही मान्य झाली नाही.’’

‘‘दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून भाजपला हद्दपार करावे लागेल. पवारांचे राजकारण संपवायला अजून कुणी जन्माला आलेला नाही. चंद्रकांतदादांनी एखाद्याची उंची पाहून टीका करावी. ती न पाहता टीका केली, तर ज्या सत्तेवर विराजमान आहात, तेथून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही.’’

- प्रा. जालंदर पाटील

Web Title: Loksabha 2019 Raju Shetti comment in Kolhapur