Loksabha 2019 : काँग्रेस जिल्हा अध्यक्षांच्या पुत्राची बंडखोरी

Loksabha 2019 : काँग्रेस जिल्हा अध्यक्षांच्या पुत्राची बंडखोरी

इचलकरंजी - काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी लोकसभेच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करण्याचा इरादा स्पष्ट केला. ते सोमवारी (ता. १) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे. त्यांनी अचानक घेतलेल्या या धक्कादायक निर्णयामुळे राजकीय क्षेत्रातून अनेक तर्क-वितर्क करण्यात येत आहेत.

लोकसभा निवडणुकीचे रणांगण तापण्यास सुरुवात होत आहे. अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हातकणंगले मतदारसंघातून नव्या राजकीय घडामोडीची चाहूल लागली आहे. येथे काँग्रेस आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी विरुद्ध भाजप - शिवसेना युतीचे धैर्यशील माने यांच्यात लढत होईल, असे पहिल्या टप्प्यात चित्र स्पष्ट होत आहे; पण बुधवारी राहुल आवाडे यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने आज त्याची शहर व परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निवडणुकीला उभे राहण्यासाठीच आपण उमेदवारी अर्ज घेऊन आल्याचे सांगितले. त्यामुळे या निवडणुकीत ते बंडखोरी करणार काय, याकडे लक्ष लागले आहे. 

दहा वर्षांपूर्वी देखील राहुल आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी केली होती; मात्र ते मैदानात उतरले नाहीत. त्यानंतर त्यांनी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीकडून जिल्हा परिषद निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले होते. लायन्स क्‍लबच्या प्रांगणात मंगळवारी श्री. शेट्टी यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. त्यावेळी राहुल आवाडे उपस्थित होते. आज मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा संदेश दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या या निर्णयाची माहिती काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनाही नव्हती. येत्या दोन-तीन दिवसांत मोठ्या धक्कादायक घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत.

बंडखोरीचा फायदा कोणाला?
राहुल आवाडे यांनी बंडखोरी केली तर त्याचा फायदा कोणाला होणार, याचीही चर्चा रंगू लागली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे या मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांची बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडणार, याबाबतही अनेक तर्क-वितर्क करण्यात येत आहेत.

‘कामाला लागा’ सोशल मीडियातून संदेश
हातकणंगलेमधून आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी आहेत; पण राहुल आवाडे यांनी सध्या तरी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज आणला असला तरी प्रत्यक्षात भरणार काय, याबाबत संभ्रमावस्था आहे; पण त्यांनी स्वतः सोशल मीडियावर ‘कामाला लागा’ असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे ते खरोखरच निवडणुकीच्या रिंगणात येणार की माघार घेणार, याचीही तितकीच उत्सुकता आहे.

राज्यातील लोण कोल्हापूरपर्यंत

राज्यातील दोन्ही काँग्रेसचे बडे नेते बंडखोरी करून भाजप किंवा शिवसेनेत जात असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकसंध आहे, असे चित्र असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातही या बंडखोरीचे लोण पोचले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्याच घरात बंडखोरीचा इशारा त्यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी दिला आहे. आपण १ एप्रिलला उमदेवारी अर्ज भरणार, असे सांगून राहुल यांनी वडिलांसह आघाडीच्या नेत्यांचे टेन्शन वाढवले आहे. 

लोकसभेसाठी राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. आघाडी अंतर्गत जिल्ह्यातील दोन्हीही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहेत. यापैकी हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. तेथून खासदार राजू शेट्टी यांनी उमेदवारी अर्जही भरला आहे. तथापि, याच मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आवाडे यांचे पुत्र राहुल यांनी काल (ता. २७) अर्ज नेला होता. राहुल यांनी निवडणूक लढवणार असे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या घरात बंडखोरी होणार की हे बंड थंड केले जाणार, याची उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com