Loksabha 2019 : संजय पाटलांच्या उमेदवारीवरून शिवसेनेत माजली यादवी 

Loksabha 2019 : संजय पाटलांच्या उमेदवारीवरून शिवसेनेत माजली यादवी 

सांगली - शिवसेनेच जिल्हाप्रमुख संजय विभूते यांची गटबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी दिला.

कवठेमहांकाळ येथील तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांनी भाजपचे सांगली लोकसभेचे उमेदवार संजय पाटील यांच्याविरोधात वक्तव्य करतानाच ही निवडणूक लढवण्याचाही निर्धार केला होता. यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते हजर होते. या पार्श्‍वभूमीवर श्री घेवारे यांनी पत्रकार परिषद घेऊन विभूते यांना लक्ष्य केले. 

श्री घेवारे म्हणाले,"" शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाच आदेश पाळतात. त्यामुळे सांगलीतही युतीचा आदेश पाळला जाईल. जिल्हाप्रमुख संजय विभुतेंविरोधात ठाकरे यांच्या कोल्हापूरच्या दौऱ्यात तक्रार केली जाईल. मी 1970 पासून शिवसेनेत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आदेश पाळून काम करतो. त्यांचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून शिवसेनेत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना युती झाली आहे. त्यामुळे युतीचा आदेश पाळून सर्व शिवसैनिक काम करतील. शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे. सांगली लोकसभा निवडणुकीतही शिवसेना खासदार पाटील यांचा प्रचार करेन. युतीच्या उमेदवारांना विरोध करणाऱ्या जिल्हाध्यक्ष विभुतेंना सेना कोणाच्या पाठीशी हे नंतर कळेलच. पक्षात कोणाचीही गटबाजी चालू देणार नाही. जिल्ह्यात शिवसेनेच्या 1865 शाखा होत्या. सध्या 65 शाखासुद्धा नाहीत. शिवसेना जिल्हाप्रमुखांनी प्रथम याकडे लक्ष द्यावे. आज शिवसेनेचे सांगलीत अधिकृत कार्यालय त्यांना सुरू करता आले नाही. त्यांच्याविषयी 24 मार्चच्या कोल्हापूर दौऱ्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्याकडे तक्रार केली जाईल. तसेच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पुन्हा झंझावात निर्माण केला जाईल. कार्यकर्ते रस्त्यावर उतरून युतीच्या उमेदवाराचा प्रचार करतील.'' 

खासदारांना पाच वर्षात युतीधर्म आठवला नाही - संजय विभुते

पाच वर्षाच्या सत्ताकाळात खासदार संजय पाटील यांना युतीधर्म आठवला नाही याची जाणीव शिवसैनिक करून देतील असे स्पष्टीकरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिले. श्री विभुते यांनी संजय पाटील यांना पाडा असे म्हटल्याचाही इन्कार केला. 

ते म्हणाले,"" खासदार पाटील यांनी गेल्या पाच वर्षात शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक दिलेली नाही. जिल्हा नियोजन समिती, संजय गांधी समिती, दक्षता समित्यांसह विविध शासकीय समित्यांवर शिवसैनिकांना डावलले त्याचा रोष कार्यकर्त्यांचा मनात आहे. किमान 33 टक्के जागांवर शिवसैनिकांना संधी मिळायला हवी होती. मात्र तसे आम्हाला पाच वर्षे डावलले. त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटू शकतात. आमची ही नाराजी आम्ही त्यांच्याही कानावर घातली आहे. संपर्क नेते बानुगडे पाटील यांच्यासोबत साताऱ्यात काल झालेल्या बैठकीतही हा विषय झाला. आम्ही त्यांना पराभूत करणार असे कधीही म्हटलेले नाही. युती धर्म म्हणून आम्ही त्याचे पालन करणार आहोतच. कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांचा आदेशच अंतिम मानून शिवसैनिक काम करतील याबद्दल कोणतीही शंका नाही. मात्र कार्यकर्त्यांची नाराजी समजून घेतली पाहिजे. त्याचे भांडवल कोणी करू नये.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com