Loksabha 2019 : सांगलीत तिरंगी लढतीत नवी समीकरणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर यांच्या एन्ट्रीने नवी समीकरणे तयार होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर जिल्ह्यात नेमक्‍या कोणत्या मतदारसंघात काय चित्र राहील याचा अंदाज घेण्याची धावपळ सुरू होती. ही तिरंगी लढत राज्यात लक्षवेधी होईल, अशी सध्याची स्थिती निर्माण झाली आहे.

भाजपने औदुंबरच्या डोहात सारे मतभेद बुडवून एक दिलाने खासदार संजय पाटील यांचे काम करण्याचा निर्धार केला. सांगलीची निवडणूक बिनविरोध होते की काय, असा अंदाज वर्तवला गेला. त्यानंतर आघाडीच्या जागा वाटपत काँग्रेसला ही जागा सोडावी लागली, मात्र काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून समोर आणले.

सांगलीत एकाच एक अशी तगडी लढत उभी राहील, असे चित्र होते. दरम्यानच्या काळात स्वाभिमानीच्या उमेदवारीच्या शक्‍यता संपल्याने गोपीचंद पडळकर यांनी तातडीने गिअर बदलत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. श्री. पडळकर मैदानात उतरल्याने जातीय, राजकीय समीकरणे पूर्णतः बदलून जातील, अशी शक्‍यता आहे. धनगर, दलित, मुस्लिम व अन्य बहुजन मतांचा टक्का कसा विभागला जातो यावर तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत.

पडळकर यांनी आज केलेले शक्तिप्रदर्शन त्यांच्या उमेदवारीचा नेमका परिणाम काय होईल, या विषयीच्या तर्कवितर्कांना नव्या वाटा फोडणारे होते. प्रचाराच्या पातळीवर खासदार संजय पाटील यांना आठ दिवस आधीच उमेदवारी जाहीर झाल्याचा फायदा होत आहे. विशाल पाटील यांनीही कालपासून मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली.

पडळकर यांचे चिन्ह अजून निश्‍चित नाही, मात्र त्यांनी गावोगावी कार्यकर्त्यांची फळी बांधण्यासाठी तयारीला सुरुवात मात्र केली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत सांगली लोकसभेच्या निवडणुकीत रंगत येणार का? असा प्रश्न विचारला जात होता. आता ही निवडणूक तिरंगी होणार आणि अनेक रंग भरले जाणार आहेत. उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आणखी कोणता चेहरा समोर येतोय, हा औत्सुक्‍याचा विषय आहे.

Web Title: Loksabha 2019 Sangli Lok Sabha Constituency