Loksabha 2019 : सांगलीतून २१ जणांचे अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

एक नजर

  • लोकसभेच्या सांगली मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर २१ जणांचे ४२ अर्ज दाखल.
  • उमेदवारी अर्जांची आज (ता. ५) छाननी.
  • माघारीची अंतिम मुदत सोमवारी (ता. ८) दुपारी तीनपर्यंत.

सांगली - लोकसभेच्या सांगली मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर २१ जणांनी ४२ अर्ज दाखल केले. अपेक्षेपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जांची आज (ता. ५) छाननी आहे. माघारीची अंतिम मुदत सोमवारी (ता. ८) दुपारी तीनपर्यंत आहे. 

भाजपकडून संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात पर्यायी चार अर्जांचा समावेश आहे. प्रमुख पक्ष, आघाड्यांच्या तिन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. पहिल्या टप्प्यात बैठका, प्रमुख नेत्यांच्या गाठी-भेटीवर भर दिला आहे. त्यांच्या पक्ष नेत्यांनीही पदयात्रा सुरू केल्या आहेत. निवडणूक चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. 

संजय पाटील यांनी कवठेमहांकाळ तालुक्‍यातील गावागावांत बैठका घेतल्या. विशाल पाटील यांनी सांगली व मिरज पूर्व भाग पिंजून काढला. काँग्रेसच्या जयश्री पाटील यांची खणभागात पदयात्रा झाली. गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी  आणि प्रचार यंत्रणांसाठी वेळ दिला. अर्ज माघारीनंतर सोमवारी मैदानात कितीजण राहतात, हे स्पष्ट होणार  आहे. मतदान २३ एप्रिल रोजी आहे.

Web Title: Loksabha 2019 Sangli Lok Sabha Constituency