Loksabha 2019 : मंडलिकांच्या स्थावरमध्ये ७.८१ कोटींची वाढ

Loksabha 2019 : मंडलिकांच्या स्थावरमध्ये ७.८१ कोटींची वाढ

कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या स्थावर मालमत्तेत पाच वर्षांत तब्बल ७.८१ कोटींची तर जंगम मालमत्तेत १५.३९ लाखांची वाढ झाली आहे. स्थावर मालमत्तेची आजच्या बाजारभावाने किंमत वाढल्याने ही वाढ दिसत आहे. 

श्री. मंडलिक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या अर्जासोबत जोडलेल्या विवरणपत्रात ही माहिती दिली आहे. २०१४ ला श्री. मंडलिक यांच्याकडे ३१ लाख १७ हजारांची जंगम मालमत्ता होती, आज ही मालमत्ता ४७.१० लाख रूपयांची झाली आहे. त्यांच्याकडे २०१४ मध्ये ४६ लाख ८४४ रूपयांची स्थावर मालमत्ता होती, ती आता ८.२८ कोटी रुपयांची झाली आहे.

गेल्या निवडणुकीत त्यांचे करपात्र उत्पन्न ३ लाख ५४ हजार रूपये होते तर यावेळी ते ११.६३ लाख रुपये झाले आहे. त्यांच्या पत्नी सौ. वैशाली यांच्याकडील जंगम मालमत्तेत वाढ झाली आहे; पण त्यांच्या नावावरील स्थावर मालमत्ता घटली आहे. 

ठेवी ३८.५४ लाखांच्या
प्रा. मंडलिक यांच्या विविध बॅंकांत ठेवी व बचत खात्याची मिळून सुमारे ३८.५४ लाख रक्‍कम आहे. पत्नी सौ. वैशाली यांच्या नावे १.५४ लाखांच्या तर मुलगा विरेंद्रच्या नावे २.४ लाख, यशोवर्धनच्या नावे ६५ हजारांच्या ठेवी, बचत खात्यातील रक्कम आहे. 

पावणेदोन लाखांचे सोने
प्रा. मंडलिक यांच्याकडे २.७२ लाखांचे ८० ग्रॅम सोने तर पत्नी सौ. वैशाली यांच्या नावे ११ लाख ९० हजारांचे ३५० ग्रॅम, मुलगा यशोवर्धनकडे ६८ हजारांचे २० ग्रॅम सोने आहे. त्यांच्याकडे असलेल्या शेतजमीनीची बाजारभावाने किंमत ८८ लाख ५८ हजार आहे. 

मंडलिकांच्या नावे एकही वाहन नाही
प्रा. मंडलिक यांच्या नावावर एकही वाहन नाही, पण त्यांचा मुलगा वीरेंद्र यांच्या नावे एक चारचाकी वाहन व तीन दुचाकी वाहनांचा समावेश आहे. मुलगा वीरेंद्र यांच्या नावे १५ लाखांची वाहने आहेत. त्यात २० हजाराची ॲक्‍टीव्हा, ६० हजाराची यामाहा, ११.३० लाखाची चारचाकी व ३.५० लाखाची एक दुचाकी या वाहनांचा समावेश आहे.

१.६० कोटींचे कर्ज
प्रा. मंडलिक यांच्या नावावर फेडरल बॅंकेचे ५७.८० लाखाचे गृह कर्ज तर जिल्हा बॅंकेचे १० लाखाचे शैक्षणिक कर्ज असे ६८ लाखांचे कर्ज आहे. याशिवाय त्यांनी काही व्यक्तीकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम ९२ लाख रूपये आहे. मुलगा विरेंद्र यांच्या नांवे ६ लाखांचे दोन बॅंकांचे वाहन कर्ज आहे. 

प्राप्तिकर उत्पन्नात वाढ
प्रा. मंडलिक यांचे गेल्या पाच वर्षातील प्राप्तिकरप्राप्त उत्पन्न असे-२०१४-१५- ५.६६ लाख, २०१५-१६ः ६.९४ लाख, २०१६-१७ ः-१२.३१ लाख, २०१७-१८-१४.९९ लाख, २०१८-१९ः- ११.६३ लाख रूपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com