Loksabha 2019 : बारा हजार जवान देणार ऑनलाइन मत

विशाल पाटील
गुरुवार, 11 एप्रिल 2019

शूरवीरांचा, क्रांतिकारकांचा, सैनिकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक सैनिक मतदार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात तब्बल नऊ हजार ५०२, तर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात दोन हजार ६४२ सैनिक मतदार असून, ते देशसेवेसाठी सीमेवर तैनात आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्यांना मतपत्रिका ऑनलाइन पाठविल्या जाणार आहेत.

साताऱ्यातील ९५०२, तर माढ्यातील २६४२ सैनिक मतदार देशसेवेसाठी सीमेवर
सातारा - शूरवीरांचा, क्रांतिकारकांचा, सैनिकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक सैनिक मतदार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात तब्बल नऊ हजार ५०२, तर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात दोन हजार ६४२ सैनिक मतदार असून, ते देशसेवेसाठी सीमेवर तैनात आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्यांना मतपत्रिका ऑनलाइन पाठविल्या जाणार आहेत.

निवडणुकीत पात्र मतदारांचा सहभाग वाढावा, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. या लोकसभा निवडणुकीपासून त्याची अंमलबजावणी होत आहे. देशसेवेसाठी सीमेवर तैनात असलेल्या मतदारांना पूर्वी टपालाने मतपत्रिका पाठविल्या जात होत्या. येत्या लोकसभा निवडणुकीपासून या मतपत्रिका ऑनलाइन पाठविल्या जाणार आहेत. त्याची कार्यवाही चार एप्रिलपासून सुरूही झाली आहे. 

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, चिन्ह वाटपही झाले आहे. त्यामुळे सातारा व माढा मतदारसंघातील जवानांना नियुक्तीच्या ठिकाणी ऑनलाइनने मतपत्रिका पाठविल्या जाणार आहेत. या मतपत्रिका पाठविण्याची जबाबदारी त्या-त्या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे पार पाडतील. या मतपत्रिकांवर उमेदवारांचे नाव, राजकीय पक्षांचे नाव, उमेदवाराचा फोटो व नोटा याचा समावेश आहे. या प्रक्रियेमध्ये निवडणूक अधिकारी मतपत्रिका व इतर चार कागदपत्रे अपलोड करून इपीबी पीन जनरेट करणार आहेत. त्यानंतर युनिट लेव्हलचे अधिकारी ही सर्व कागदपत्रे डाउनलोड करून सैनिक मतदारांना देणार अहेत. याबाबतचे वेळापत्रकही निवडणूक आयोगाने निश्‍चित केले आहे. 

कार्यालय प्रमुखांच्या समोर जवानांची ओळख पटवून मतदान घेतले जाणार आहे. मतदान झाल्यानंतर ता. २३ मे रोजी सकाळी ७.५९ मिनिटापर्यंत ई-पोस्टल बॅलेट स्वीकारण्याची अंतिम मुदत आहे.

सातारा जिल्ह्यात १२ हजार १४४ सैनिक मतदार असून, राज्यात सर्वाधिक सैनिक मतदार सातारा जिल्ह्यात आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जवानांना ऑनलाइन मतपत्रिका पाठवत आहोत. त्यासाठी चार एप्रिल २०१९ ची सैनिक मतदारांची अंतिम यादी निश्‍चित केली आहे.
- मंजूषा म्हैसकर, उपजिल्हाधिकारी

Web Title: Loksabha Election 2019 Jawan Online Voting I Will Vote