नरेंद्र पाटील एकदम ‘रिलॅक्‍स’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

मतदारांचे मानले आभार...
निवडणुकीतील मतदानानंतर दोन दिवसांनी नरेंद्र पाटील यांच्या आई वत्सलाताई यांचे निधन झाले. ते आभाळाएवढं दु:ख आणि वेदना काळजात दाबून ठेवत श्री. पाटील यांनी उत्तरकार्य विधीनंतर जिल्हाभर फिरून मतदार व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन आभार मानले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकांतून त्यांनी मतदानाचा आढावा घेत निवडणुकीत कमी वेळात अधिक चांगले काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

ढेबेवाडी - सातारा लोकसभा मतदारसंघात मोठ्या चुरशीने झालेल्या निवडणुकीचा निकाल काय असेल, याबद्दल अनेक नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील मात्र गावाकडे दैनंदिन कामात व्यस्त दिसत आहेत. आज सकाळी त्यांनी ढेबेवाडीतून बुलेटवरून फेरफटका मारला. गावकऱ्यांशी राजकारणाबाहेरच्या गप्पा मारत शेतातून फिरताना त्यांनी पेरणीपूर्वीचे नियोजनही केले. राजकीय जीवनातील मोठ्या परीक्षेचा निकाल तोंडावर असतानाही ‘रिलॅक्‍स’ वाटणाऱ्या नेत्याचे कार्यकर्त्यांसह नागरिकांनाही विशेष वाटले. 

माथाडी संघटना व त्यांच्याशी संलग्न विविध संस्था तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा व्याप पाठीमागे असतानाच अलीकडे साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढविलेल्या निवडणुकीमुळे काही महिन्यांपासून त्यांचे शेड्युल एकदम बिझी झाले. पाटील कुटुंबिय पूर्वीपासून मुंबईपेक्षा गावाकडेच राहणे अधिक पसंत करतात. मुंबईत साहेब आणि गावाकडे एक सामान्य गावकरी अशी स्वतःची वेगळी ओळख राखण्यात नरेंद्र पाटील यशस्वी ठरले आहेत. आज सकाळी त्यांनी ढेबेवाडीतून बुलेटवरून फेरफटका मारला. एका प्रकरणात पोलिस ठाण्याजवळ जमलेल्या कार्यकर्ते व ग्रामस्थांची तक्रार शांतपणे ऐकून कायद्याचा आदर आणि मान राखण्याचा सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत. त्यानंतर एका नागरिकाने त्यांची बुलेट अडवून घरी येण्याचा आग्रह केल्यावर तिथे लिंबूपाणी पितानाही त्यांनी मुलाबाळाचं कसं चाललंय इथपासून, घराला ही टाईल्स कुठली वापरली, इथपर्यंतच्या घरगुती चर्चा करणेच त्यांनी पसंत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Result Narendra Patil Relax