उमेदवारीवरच भाजपचे भवितव्य

अभय दिवाणजी
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

सुशीलकुमार शिंदेंना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याचे मानून प्रचाराच्या आघाडीवर हालचाली सुरू आहेत. तर गड राखण्यासाठी भाजप सरसावत असला तरी उमेदवार कोण, यावर एकमत न झाल्याने काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सुशीलकुमार शिंदेंना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याचे मानून प्रचाराच्या आघाडीवर हालचाली सुरू आहेत. तर गड राखण्यासाठी भाजप सरसावत असला तरी उमेदवार कोण, यावर एकमत न झाल्याने काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सोलापूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आतापर्यंतच्या एकोणीसपैकी केवळ सहा निवडणुकीत काँग्रेसविरोधी उमेदवार निवडून आलेत. जनता पक्षाच्या लाटेतही मतदारसंघाने काँग्रेसला साथ दिली. १९९५ मध्ये (कै.) लिंगराज वल्याळ यांच्या रूपाने प्रथमच पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपने खाते खोलले. २०१४ च्या मोदी लाटेत तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) यांचा शरद बनसोडे (भाजप) यांनी दीड लाख मतांनी पराभव केला. ते जाएंट किलर ठरले.

काँग्रेसकडून शिंदेंच्या नावाची चर्चा आहे. भाजपमध्ये मात्र अद्याप उमेदवारीबाबत अनिश्‍चितता आहे. सध्या कोणतीही लाट नसल्याने उमेदवारी कोणाला मिळणार यावरच भाजपची मदार राहील.

सुशीलकुमार शिंदेंची उमेदवारी निश्‍चित मानून बैठका, मेळावे, जनसंपर्क अभियान सुरू आहे. यशासाठी त्यांना मोहोळ, अक्कलकोट आणि पंढरपूर या विधानसभा मतदारसंघांत लक्ष देणे आवश्‍यक आहे. २०१४ मधील निवडणुकीत येथून ते पिछाडीवर होते. माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व असलेला मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. तेथेच बनसोडेंना सुमारे १३ हजारांचे मताधिक्‍य मिळाले. शिंदेंच्या उमेदवारीला मोहोळकरांचा विरोध असला तरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगतील त्यांचा प्रचार करू, अशी भूमिका घेतली जात आहे. पंढरपूरमध्ये काँग्रेसचा आमदार असला तरी, आमदार प्रशांत परिचारकांमुळे भाजपची बाजू वरचढ राहील, असे वाटते.

पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील विळ्याभोपळ्याच्या सख्ख्यामुळे पक्षासमोर कोणत्या गटाला उमेदवारी द्यावी, यावर मोठे प्रश्‍नचिन्ह आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी दोन्ही गटांकडून एकच नाव सुचविण्याचा आदेश दिला. त्यामुळे भाजपने डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महाराज (गौडगाव) यांना उमेदवारीसाठी गळ घातली आहे. सहकारमंत्री गटाकडून अमर साबळे, तर पालकमंत्री गटातून बनसोडेंच्या नावाचा आग्रह होता. परंतु अलीकडे बनसोडे यांच्या उमेदवारीबाबत पालकमंत्री गट अनुत्सुक आहेत. वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. ‘रिपाइं’ने (आठवले गट) सोलापूरची जागा पक्षाला सोडण्याची मागणी केली आहे. लिंगायत, दलित, धनगर, मुस्लिम, पद्मशाली, मराठा या जातींचे वर्चस्व असलेल्या सोलापूर मतदारसंघातून उमेदवारीसाठी नेत्यांचा कल आहे.

२०१४ चे मतविभाजन
ॲड. शरद बनसोड (भाजप) - ५,१७,८७९ (विजयी)
सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) - ३,६८,२०५

चित्र मतदारसंघाचे 
    मूलभूत सुविधांअभावी पाण्याचे नियोजन विस्कळित
    मोठा उद्योग, कौशल्य विकास केंद्र गरजेचे
    नमामि चंद्रभागा योजना, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाकडे दुर्लक्ष
    रेल्वेच्या दुहेरीकरण, विद्युतीकरण, विमानतळाचा प्रश्‍न रखडलेला
    साखर कारखानदारी अडचणीत, शेतकऱ्यांना आर्थिक फटका
    रखडलेल्या उपसा सिंचन योजना पूर्णत्वाची प्रतीक्षा

Web Title: Loksabha Election BJP Politics