पाय खेचण्याच्या राजकारणात रखडला विकास

रमेश धायगुडे
शनिवार, 8 जुलै 2017

लोणंद नगरपंचायत - ‘खेळीमेळी’ दाखवण्यापुरतीच; आरोप-प्रत्यारोप करणारे विकासकामांत गप्प

लोणंद नगरपंचायत - ‘खेळीमेळी’ दाखवण्यापुरतीच; आरोप-प्रत्यारोप करणारे विकासकामांत गप्प

लोणंद - लोणंद नगरपंचायत अस्तित्वात येऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला. मात्र, सध्या विकास रोडावल्याचे चित्र आहे. सत्ताधारी व विरोधक ओडूनताणून दाखवण्यापुरते खेळीमेळीचे राजकारण करत असले तरी प्रत्यक्षात आतून एकमेकांचे पाय खेचण्यातच ते मग्न दिसतात. शहराच्या विकासाबाबत ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असल्या तरी विकासकामे मार्गी लावण्याबाबत सर्वांनीच चुप्पी धरली आहे. लोणंद नगरपंचायतीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, भाजपचे दोन व एक अपक्ष नगरसेवक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्नेहलता शेळके-पाटील या नगराध्यक्षा, तर भाजपचे लक्ष्मणराव शेळके-पाटील हे उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहात आहेत. काँग्रेसचे सहा नगरसेवक व एक स्वीकृत नगरसेवक विरोधी बाकावर आहेत. लोणंद नगरपंचायतीनंतर शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी आशा होती. मात्र, तसे काहीही झालेले दिसत नाही. 

मुख्याधिकाऱ्यांचा खो-खो
मुख्याधिकारी व नगरसेवकांत कामकाज समजून घेण्याचीच प्रक्रिया सुरू दिसते. त्यातून मुख्याधिकाऱ्यांचा ‘खो-खो’चा डाव सुरू आहे. त्यामुळे कामकाजाला गती नाही. मुख्याधिकारी अभिषेक परदेशी मध्यंतरी रजेवर गेल्यावर फलटणच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लोणंदचाही चार्ज होता. आता पुन्हा परदेशी आले आहेत. दीड-दोन महिन्यांपूर्वी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात उठाव करून पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या बदलीचा प्रस्ताव निवेदनाद्वारे मांडला. त्यानंतर काहीही झाले नाही. 

अनेक विकासकामे रखडली
शहराची महत्त्वाची ७ बाय २४ ही पाणीपुरवठा योजना अद्यापही मार्गी लागली नाही. सर्वच पक्षांकडून या योजनेचे केवळ राजकीय भांडवल केले जात आहे. आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते येथे सांडपाणी संकलन व जलशुध्दीकरण युनिटचा प्रारंभ झाला. हे कामही अद्यापपर्यंत सुरू झाले नाही. भुयारी गटारांच्या योजनेलाही चालना नाही. खेमावती नदी शुध्दीकरण, सुसज्ज बगीचा, लोणंद बस स्थानासमोर व्यापारी संकुलाची इमारत, ग्रामीण रुग्णालय, सार्वजनिक शौचालयांची युनिट नव्याने बांधणे, शहरात ठिकठिकाणी महिला व पुरुषांसाठी सुलभ शौचालये उभारणे, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशामक बंब उपलब्ध करणे आदी कामे रखडली आहेत. लोणंद शहर प्रगत, स्वच्छ व सुंदर शहर म्हणून नावारूपाला आणण्याचे निवडणुकीदरम्यान सर्वांनीच दिलेली आश्वासने कोणता पक्ष पाळून त्या दिशेने प्रयत्न करत असल्याचे दिसत नाही. पान २ वर 
 

आनंदराव शेळके-पाटील व ॲड. बाळासाहेब बागवान एकत्र?
लोणंदच्या राजकीय आखाड्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आनंदराव शेळके-पाटील व जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. बाळासाहेब बागवान हे अनेक कार्यक्रमांत एकत्र येताना दिसत आहेत. या दोघांच्यातील जवळीचीही चर्चा आहे. नगरपंचायतीतील भाजपच्या चंचुप्रवेशाने आपले राजकीय अस्तित्वच धोक्‍यात येत असल्याची जाणीव झाल्याने हे दोन्ही नेते एकत्र आले असावेत, अशीची चर्चा आहे. एकंदरीत श्री. शेळके-पाटील व राष्ट्रवादीत अंतर पडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Web Title: lonand satara news development stop by politics